बाळाच्या जन्मापासून १००० दिवस

He, who has health has hope and he, who has hope has everything !

या उक्ती प्रमाणे ज्याच्याकडे चांगले आरोग्य आहे, त्याच्याकडे उज्वल भविष्याची आशा आहे आणि ज्याच्याकडे आशा आहे त्याच्याकडे सर्व काही आहे !

चांगले आरोग्य म्हणजेच निरोगी शरीर आणि निरोगी मन. पण ही एक आदर्श स्थिती आहे व खऱ्या आयुष्यात अशी स्थिती मिळवणे आणि टिकवणे सोपे मुळीच नाही. ज्याप्रमाणे विशाल वृक्षांनाही वादळ, वारे , पाऊस, ऊन अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते, त्याचप्रमाणे मनुष्यालाही आयुष्य जगताना वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, नैसर्गिक व मानवनिर्मित अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो .या सगळ्या परिस्थितीमध्ये डार्विनच्या , सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट - म्हणजेच जो सर्वदृष्टीने योग्य आणि उचित असेल तोच जगेल ....या नियमाने जो जन्मत :च सुदृढ व सशक्त असेल अशाच व्यक्तींना भविष्यातही उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभेल , असे आपण म्हणू शकतो. 

मनुष्याच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस हे महत्वाचे असतात .मातेच्या गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षाचे होईपर्यंतचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो. याच  सुवर्ण काळात बाळाच्या योग्य वाढीचा आणि विकासाचा पाया रचला जातो .या काळात मातेची आणि बाळाची विशेष काळजी घेतली गेली, त्यांना योग्य आहार आणि पोषण दिले गेले तर जन्म घेणारे बाळ केवळ जगणारच नाही तर त्याची शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक वाढ उत्तम होईल . ही भावी पिढी अनेक बिकट संकटावर मात करून समाजात सुस्वास्थ्य , स्थैर्य आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यात सक्षम असेल.
 
    आपला भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच भारताचा जन्मदर देखील अधिक आहे .पण कुठल्याही देशाच्या आरोग्य सेवेचा स्तर दर्शविणाऱ्या एककांपैकी एक म्हणजेच infant Mortality Rate, IMR किंवा बालमृत्यू दर हा देखील अधिक आहे .भारताचा बालमृत्यू दर १००० शिशुंमध्ये 27 आहे. म्हणजे प्रत्येक हजार शिशूमागे 27 मुलांचा दरवर्षी विविध कारणांनी मृत्यू होतो. हा दर अतिशय जास्त असून आपल्या देशात बालकांचे आरोग्य असुरक्षित आहे, असेच दिसून येते. 

भारतातील बालमृत्यू दर अधिक असण्याची महत्वाची कारणे कोणती? 

  1. Premature and low birth weight Babies- वेळेच्या आधीच जन्म घेणारे बाळ किंवा कमी दिवसांचे बाळ आणि कमी वजनाचे बाळ.
  2. Pnumonia _ फुफुसाचा जंतुसंसर्ग म्हणजेच Pnumonia.
  3. Birth Asphyria / Birth trauma  - जन्मत : श्वास गुदमरणे . जन्माच्या वेळी होणाऱ्या इजा.
  4. Non communicable disease
  5. Diarrhoea -अतिसार 
  6. इतर जन्मजात शारीरिक दोष इत्यादी आहेत.
     

1. आपल्या देशात एकूण गर्भवती स्त्रियांपैकी केवळ ५० % महिलांनाच योग्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार वेळीच मिळतो. गर्भावस्थेतच योग्य पोषणाचा अभाव, लोह, फॉलिक ऍसिडची कमतरता, उच्च रक्तदाब , गर्भावस्थेतील मधुमेह , विश्रांतीचा अभाव या सर्व कारणांमुळे कमी दिवसात प्रसूती होऊन कमी दिवसांचे आणि कमी वजनाचे बाळ जन्माला येते . तसेच पूर्ण दिवस भरूनही कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, असे प्रकार दिसून येतात.
वरील दोन्ही परिस्थितीत जन्माला येणारे बाळ अतिशय नाजूक असते. त्याच्या जीवाला आणि मातेच्याही जीवाला धोका असतो. अशा बालकांचा योग्य उपचारा अभावी मृत्यू होण्याचा संभव अधिक असतो.

2. Pneunomia- फुफ्फुस जंतुसंसर्ग
 भारतातील लोकसंख्या अधिक असल्यामुळे तसेच जास्तीत जास्त नागरिक हे मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय आहेत . त्यांचे राहणीमान अतिशय साधे आहे. गजबजलेल्या ठिकाणी, अस्वच्छ वातावरणात देखील अनेक लोक राहतात. अशा परिस्थितीत जंतूजन्य आजार होण्याची आणि ते अतिशय वेगाने पसरण्याची स्थिती असते. फुफ्फुसांचा जंतुसंसर्ग होऊ नये, म्हणून सरकारच्या मार्फत मोफत लसीकरण करण्यात येतेही. परंतु योग्य वेळी लसीकरण करून न घेतल्यामुळे तसेच लसीकरण आणि स्तनपान इत्यादी बद्दल बरेच गैरसमज समाजात आहेत . यामुळे दुर्देवाने जास्तीत जास्त बालके, असे टाळता येणाऱ्या गंभीर आजारांना सहज बळी पडतात.

3.  प्रसुती दरम्यान बाळाचा श्वास गुदमरणे किंवा बाळाला गंभीर इजा होते . प्रसुती तज्ञ व्यक्तीं मार्फत करावी  . ती आरोग्य केंद्रातच झाली पाहिजे .प्रसूती दरम्यान स्त्री रोग तज्ञ ,जसे तज्ञ दाई किंवा बालरोग तज्ञ हजर असणे आवश्यक आहे .तसेच आरोग्य केंद्रांवर जिथे प्रसूती करण्यात येते, तिथे ऑक्सिजनचा पण प्रबंध असणे गरजेचे आहे .तसेच High Risk Pregnancy म्हणजे जेथे माता किंवा गर्भातील बालकांच्या जीवाला धोका असतो, त्यांना हलविण्यासाठी ॲम्बुलन्सची देखील सुविधा असणे महत्त्वाचे आहे. या कारणांमुळे बरेचदा बालमृत्यू थांबवणे सोपे होते.

4. Non communicable disease - काही बालमृत्यू हे जन्मजात जेनेटिक आजार, घरगुती अपघात इत्यादीमुळे होतात. 

5. अतिसार किंवा डायरियामुळे देखील मृत्युक कारण ठरतात. मातेच्या दुधाऐवजी पर्यायी दूध देण्यासाठी बाटलीचा वापर करणे, दूध वरचेवर देताना योग्य स्वच्छता न पाळणे, तसेच विषाणूच्या संसर्गामुळे बालकांमध्ये अतिसार होतो. अतिसारामुळे बालकांच्या शरीरातील पाणी जलद गतीने कमी होऊन डीहायड्रेशन होते आणि आजार लवकरच गंभीर होऊन बालमृत्यू होण्याचा धोका देखील वाढतो.
 तसेच झिंक, विटामिन ए ची कमतरता यामुळे देखील अतिसार होण्याची शक्यता असते. 

अशा वेळी मृत्युदर कमी करण्यासाठी बाळ गर्भात असल्यापासून पुढे बाळ दोन वर्षाचे होईपर्यंतचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो.
याच काळात योग्य काळजी कशी घ्यावी, हे आपण पाहूया.

1. मातेचे आरोग्य उत्तम असेल तर जन्माला येणारे बाळही सुदृढ असते त्यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांचे वितरण अंगणवाडीमध्ये केले जाते. त्या गोळ्यांचे नियमित सेवन करणे , आहार, व्यायाम याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असते .लग्न आणि योग्यवेळी गर्भधारणा यासाठी स्त्रीची मानसिक आणि शारीरिक वाढ योग्य असायला हवी. आणि हे निर्णय लादलेले असू नयेत. 

2. गर्भधारणेच्या वेळी स्त्रीचे वजन कमीत कमी ४० किलो असणे आवश्यक आहे. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील चांगले असायला हवे. 
गर्भवती स्त्रीची नोंदणी रुग्णालयात करणे , फॉलीक ऍसिड, लोहाची मात्रा देणे ,सोनोग्राफी करणे, गर्भातील बालकांची वाढ, तपासणी, मातेचे रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब तपासणे हे आवश्यक असते . प्रसूती झाल्यावर एक तासाच्या आत स्तनपान करणे व पुढील सहा महिने केवळ स्तनपान देणे आवश्यक आहे.  बाळाचे योग्य वेळी, डॉक्टरांच्या सूचीप्रमाणे लसीकरण करणे. 

3. बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर वरचा पूरक आणि सकस आहार देणे .वरचा आहार देताना योग्य ती स्वच्छता बाळगणे. बाळाच्या आहारात फळे, पालेभाज्या, अंडी, दूध इत्यादींचा समावेश करणे. पाच वर्षापर्यंत  व्हिटॅमिन ए , झिंक , आयर्न, कॅल्शियम, विटामिन बी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे द्यावे .

4. घरात किंवा घराबाहेर अपघात होऊ नये ,म्हणून काळजी घ्यावी . बाळ रांगणारे  असेल तर उंचीवरून पडू नये म्हणून पायऱ्यांना गेट बसवणे, टोकदार वस्तू , विषारी औषधे, मोठ्यांचे औषधे, घशात अडकू शकतील अशी खेळणी इत्यादीपासून मुलांना दूर ठेवावे. किंवा ते खेळत असताना पालकांनी लक्ष ठेवणे आणि काळजी घेणे खूपच महत्त्वाचे असते .यामुळे असे अपघात होणे टाळता येईल .आगीपासून तसेच गरम पाणी किंवा स्वयंपाकापासून देखील बाळाला दूर ठेवावे. 

5. बाळ आजारी असल्यास अंगावर दुखणे न काढता त्याला त्वरित दवाखान्यात न्यावे आणि बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा .
वरील सर्व उपाययोजना केल्यास आपण बालमृत्यू दर कमी करू शकतो. तसेच सशक्त ,सुदृढ आणि बुद्धिमान पिढी निर्माण करू शकतो .बाळाच्या वाढीतील पहिले हजार दिवस हे त्याच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहेत. बाळ निरोगी राहिले तर पालकांना देखील त्याची काळजी घेताना, त्याला वाढवताना त्रास कमी होईल .असेच सशक्त बाळ चांगल्या पद्धतीने शिकेल, सुदृढ होईल आणि निरामय होईल.


डॉ. प्रज्ञा बनसोड

बालरोगतज्ञ,