संपादकीय

आषाढ शुद्ध प्रतिपदा, आज निरामय या त्रैमासिकाच्या प्रकाशनाला सहा वर्ष पूर्ण होत आहेत.तसेच आज महाकवी कालिदास दिन . या निमित्ताने निरामयच्या सर्व संपादकीय मंडळाचे, लेखकांचे व वाचकांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

मागील अंकात ॲनेमिया हा विषय घेऊन त्यावर वेगवेगळ्या लेखातून सविस्तर माहिती देण्यात आली व वाचकांना ती कल्पना उचलून देखील धरली, त्यांना आवडली.आपले निरामयचे नियमित वाचक व देणगीदार श्री. देवेंद्रजी देवस्थळे यांनी खास SLE म्हणजेच "सिस्टमिक लुपस ईरिदेमॅटोसिस "या आजाराबद्दल लेख सादर करण्याची विनंती केली. SLE हा एक Autoimmune Disease आहे व १० मे हा दिवस world SLE day म्हणून जगभरात या आजाराविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो, तीच theme ठरवून या विषयावर" SLE एक बहुआयामी आजार " हा अगदी मुद्देसूद व तपशीलवार लेख संधीवात तज्ञ डॉ. अविनाश बुचे सरांनी लिहिला आहे.तसेच सौ .मृदुला देवस्थळे ज्या स्वतः SLE या आजाराने ग्रस्त आहेत, त्यांनी त्यांचा प्रवास आपल्यासमोर व्यक्त केला आहे, त्यांच्या या अनुभवाचा इतर रुग्णांनाही लाभ नक्कीच मिळेल.

 Autoimmune arthritis म्हणजेच स्वयम् प्रतिकार संधीवात या प्रकारात सर्वात सामान्यपणे आढळून येणारा Rheumatoid arthritis किंवा आमवात या बद्दल लेख लिहिला आहे अस्थिरोगतज्ञ डॉ नितीन पाईकराव यांनी.

"न्यूरोसायकियाट्रिस्टची डायरी" या अपल्या नियमित सदरात या वेळी Dissociative Amnesia म्हणजेच विघटनशिल स्मृतिभ्रंश या विषयावर मानसरोग तज्ञ डॉ .अक्षय चांदूरकर यांचा लेख समाविष्ट आहे .

निरोगी व सुदृढ आयुष्याचा पाया पक्का करण्यासाठी आयुष्यातील पहिले सहस्त्र दिवस म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून ते बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतचा काळ फार महत्वाचा असतो . या बद्दल माहिती घेऊया First 1000 days या लेखातून!

"समलिंगी विवाह" हा सध्या सुरू असलेला अतिशय संवेदनशील व वादग्रस्त विषय आहे . अश्या विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी की नाही, यावर सर्वांचे एकमत होणे जरी शक्य नसले तरी यावर चर्चा होणे आवश्यक आहे,असे आमचे मत आहे.याच विषयावर डॉ. अपर्णा सदाचार मॅडम यांनी त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे.

"अतिपरिचयात् अवज्ञा "या नियमाने डोळ्यापुढे असणाऱ्या,सहज उपलब्ध होणाऱ्या हितकारक वस्तुदेखील आपल्याकडून दुर्लक्षित होतात. त्यापैकीच एक म्हणजे शेवगा. शेवग्याच्या झाडाची पाने, खोड, बिया,शेंगा, इतक्या आरोग्यवर्धक आहेत की या झाडाला" ट्री फॉर लाईफ" असे म्हटले आहे. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये नव्यानेच रुजू झालेल्या आहारतज्ञ प्रतीक्षा ठोसर यांनी "शेवगा" या विषयावर लेख लिहिला आहे.

उन्हाळा संपून पावसाळ्याच्या आगमनाची आतुरता सर्व सजीव सृष्टीलाच आहे .या पावसाचा आनंद अगदी सहज व स्वच्छंदी पणे  घेता आला पाहीजे व तसाच इतरनाही देता आला पाहिजे याची जाणीव करून देणारा ललित लेख लिहिला आहे प्रा .वैशाली देशमुख यांनी.

२१ जून हा दिवस" जागतिक योगा दिवस" म्हणून पाळला जातो. योगा म्हणजे केवळ शरीराची कसरत किंवा प्राणायाम नसून ते शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य सिद्धीचे माध्यम आहे.यावर सविस्तर माहिती दिली आहे ॲड. नीलकंठ तायडे यांनी.

निरंतर फिरणारे कालचक्र व त्याच्या अनुसार बदलणारे ऋतू आपल्याला आयुष्याच्या प्रवासात सतत होणाऱ्या स्थित्यंतराची प्रचिती देतात. कुठलीही परिस्थिती कायमस्वरूपी नसून ती कालांतराने बदलणारी असते. अशा वेळी चांगल्या व वाईट दोन्हीं स्थितीत आपले मन स्थिर असायला हवे. हे साधण्यासाठी आयुष्यात सकारात्मकता, आत्मविश्वास व सजगता म्हणजेच, mindfulness यांची गरज असते. याच अनुषंगाने डॉ . हेडगेवार हॉस्पीटलतर्फे वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबविले जातात .या अंतर्गत २८ मे रोजी आयोजित करण्यात आलेला "हॅप्पी संडे -आनंद तरंग " हा कार्यक्रम.जीवनात सुख अनुभवण्यासाठी दैनंदिन जीवनात आनंदाचे क्षण फुलवणे,हसणे महत्वाचे असते, मानसरोग तज्ञ, समुपदेशक वनिता राऊत यांनी खूप छान मार्गदर्शन केले,या कार्यक्रमात १२० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले.याच बरोबर "केअर फॉर केअरगिवर्स " हा कार्यक्रम हॉस्पिटल कर्मचारी वर्गसाठी सकारात्मकता, तणाव नियोजन व स्वयंप्रेरणा यावर मार्गदर्शन करण्यासाठी ११ जून रोजी आयोजित करण्यात आला. त्यात सर्व स्टाफ अतिशय उत्साहाने सहभागी झाला.12 मे जागतिक परिचारिका दिनाचे औचत्य साधून सर्व परिचारिकांचा यात गौरव करण्यात आला.

ललित लेखापासून वेगवेगळया विषयांनी बनलेला निरामयचा हा अंक आपल्या पुढयात सादर करीत आहोत. आपल्या प्रतिक्रिया आम्हास प्रोत्साहन व दिशा दाखवण्याचे काम करतात.

लोभ असावा.

डॉ. प्रज्ञा बनसोड