पावसाचा आनंद .... आनंदाचा पाऊस

मे महिन्याचा शेवट आणि जून महिन्याची सुरवात म्हणजे जुनी मरगळ टाकून नव्याचे वेध लागण्याचा काळ होय !  पावसाचे वेध लागलेले असतात समस्त सृष्टीला आणि मनालाही. पहिल्या पावसाचा पहिला थेंब! तो थेंब, तो मृद्गंध , तो वारा आणि ग्रीष्माच्या काहीलीतून सोडवणारा पहिला पाऊस ! याहून दुसरा आनंद तो कोणता ? केवळ मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही भिजण्याचा मोह आवरत नाही. छत्री न घेता घराबाहेर असू आणि अचानक त्याने गाठले तर आपसूकच भिजण्याचा योग येतो आणि मन सुखावून जातं. काय जादू असते नाही त्या थेंबात. अशा पावसात भिजत असताना मनात एखादा कटू विचार असू शकतो का ? नाहीच. शरीरासोबतच मनही स्वच्छ , लखलखीत करणारा पाउस म्हणूनच खूपच जिव्हाळ्याचा विषय.

"खुद को इतना भी न बचाया कर 

बारीशे हो जाये तो भीग जाया कर"

पाऊस असो वा कुणाची मेहेर नजर, भिजून जायला काय हरकत आहे? दारात येवून ठेपलेल्या सुखाला घरात घ्यायलाही जमलं पाहिजे. कधीकधी हे सुख हात जोडून दारात उभं असतं. बराच वेळ ताटकळत तुमची वाट बघतं. आपण दार उघडत नाही म्हटलं की निघून जातं. मग पुन्हा परत यायला मागेपुढे पाहतं.कुणी मदतीचा हात पुढे केला की मनमोकळेपणाने घेऊन टाकावा. तुम्हालाही तुमचा हात पुढे करण्याची संधी मिळतेच की! आपण घेतले की देणे सोपे होते आणि दिले की घेण्यात संकोच उरत नाही. पाउस नाही का मनसोक्त देतो आणि मग ही धरणीही मागेपुढे पाहत नाही आकाशाला हिरवं दान देण्यासाठी! कसं जगावं , कस वागावं याचे धडे पदोपदी निसर्ग आपल्याला देत असतो. मनापासून द्यावं, मनापासून घ्यावं . चोवीस तासातला थोडा वेळ तरी मोठेपणाचा, गांभीर्याचा, पोक्तपणाचा मुखवटा काढून ठेवावा आणि स्वच्छंदपणे जगावं . जीवनाला मुक्तपणे वाहू द्यावं. मनसोक्त आनंद लुटावा आणि थोडा द्यावाही जमलंच तर .

"मजबुरीया ओढके निकलता हूं घरसे आजकल

 वरना शौक आज भी है बारीश मे भीगने का"

असं म्हणणारेही बरेचसे लोक आजूबाजूला दिसतात. एक काळ असा होता की आम्हीसुद्धा........पण आता झेपत नाही, आवडत नाही, सहन होत नाही, चालत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शोभत नाही. अशी अनंत कारणे असतात ज्यामुळे जीवनातल्या निखळ आनंदाला आपण मुकतो. आणि परिणामतः आपलं आणि आपल्या परिघातील सर्वांचं जीवन रंगहीन करून टाकतो. आपल्याला या जीवन रसात भिजायचं नसतं तेव्हा दुसरे भिजू लागले की तेही खटकतं. आपल्याला न कळलेल्या विनोदावर इतर सगळे हसतात तेव्हा वाटतं तसं काहीसं वाटू लागते. व. पु काळे म्हणतात, “पशु माणसापेक्षा श्रेष्ठ असतो कारण तो instinct वर जगतो...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही किंवा एखादा मासा उडाला असं कधी ऐकलंत का?” प्रत्येकच कृती करण्यापूर्वी फायद्यातोट्याचा विचार करायला जीवन म्हणजे काय व्यापार आहे का?


"हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे"

 हा विचार फार पुढचा आहे. माणसाने सहजपणे आपला मुळचा चांगुलपणा न दडपता जगणे हे माणुसकीची पहिली पायरी आहे. आपल्याला स्वतःशी तर चांगलं वागता यायला हवं.त्याशिवाय इतरांशी माणुसकीने कसे वागता येईल? 

"खुद को बिखरते देखते है कुछ कर नही पाते है
फिर भी लोग खुदाओं जैसी बातें करते है"

बांधून ठेवलेल्या मनाला थोड आकाश द्यावं. आपला मुळचा रंग जपावा. हसावंसं वाटलं कुणाकडे पाहून तर त्या हास्याला गालावर उमटू द्यावं. उगाचच  शिस्टपणाच्या मर्यादा घालू नयेत त्याच्यावर. एखादी गोष्ट आवडली तर मनापासून कौतुक करावं.कुणाची आठवण आली तर स्वतःहून बोलावं ‘मीच का करू नेहमी नेहमी फोन असा विचार न करता. कुणाला मदत करता आली तर सहजपणे करावी त्याचा उल्लेख करून समोरच्याला खजील न करता. धीराचे, उमेदीचे दोन शब्द बोलून खचलेल्या मनाला उभारी द्यावी. जे आत उमटतं ते जसंच्या तसं कुठलाही संस्कार न होता कोरं, करकरीत, स्वच्छ बाहेर यावं. भावनांची ही श्रीमंती, हा सहजपणा आयुष्य सोपं करतो, समाधानाचे क्षण देतो स्वतःला आणि इतरांनाही, माणसं जोडतो आणि जीवनकलेत तरबेज करतो. खळाळत्या नदीसारखी अशी जीवनरसाने तुडुंब भरून वाहणारी माणसं सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. इंग्रजी लेखक स्टीवन्सन म्हणतो, 

“A happy man or woman is a better thing to find than a five-pound note.” 

जीवनाकडे आणि विशेषतः अवतीभवती वावरणाऱ्या माणसांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघितलं की बर्याचशा प्रश्नांची उत्तर सापडू लागतात . निदान प्रश्नाचं मूळ निश्चितच सापडू शकतं.

"फितरत सोच और हालात का फर्क है वरना

आदमी कोई भी हो ... दिलका बुरा नही होता "

बस! एवढाच विचार पुरेसा आहे अकारण आयुष्यात निर्माण झालेला बराचसा गुंता सोडवायला आणि कपाळावरच्या आठ्या मिटून ओठावर हास्य फुलायला! स्वतःची ठाम मतं, पूर्वग्रह, प्रत्येक नात्याबद्दलचे काही स्वतः ठरवलेले तर काही पारंपारिक निकष, अहंकार, ही आणि अशी अनेक कुंपणं, कधी समजून उमजून, तर कधी स्वतःच्याही नकळत, माणसाने स्वतःच्या मनाभोवती घालून घेतलेली असतात. या सगळ्या कुंपणांमुळे माणसाचं बेट कधी होतं त्याचं त्यालाही कळत नाही. या बेटावर जायला सहजासहजी कोणी धजावत नाही. म्हणून हद्द ओलांडून, स्वच्छ मनाने, हात जोडून अगदी अगत्याने जीवनातल्या छोट्यामोठ्या आनंदक्षणांना आमंत्रण द्यावं . ते तयारच असतात आपल्या दाराशी!

प्रा. वैशाली रवी देशमुख