हो, मीच SLE पेशन्ट आहे

मी मृदुला देवस्थळे. कॉलेज मध्ये प्राध्यापक, उप प्राचार्य म्हणून निवृत्त. 

साधारण २००७ ची गोष्ट. माझे अचानक सांधे दुखू लागले. सांधे दुखीची ट्रीटमेंट सुरु झाली, तीही उत्तम डॉ.च्या देखरेखी खाली. मग लक्षात आले की मला खूप थकवा जाणवतोय, केस गळत आहेत, काही करू नये असं वाटतंय, वजन उतरलं, थोडंसं औदासिन्यही आलंय. डॉ.शी मी हे सर्व मोकळेपणे बोलले. 

"अगं तुला SLE असेल." मग सर्व चाचण्या सुरु झाल्या. काही दिवसांनी जाणवले कि मूत्रातून प्रथिने - प्रोटीन जाऊ लागली आहेत. किडनी बायोप्सी पर्यंत सर्व चाचण्या झाल्या, पाठोपाठ सुरु झाला स्टिरॉईडचा मोठ्ठा डोस. रात्रभर होणारी जागरणे, ताणलेले डोळे, ग्लानी व अंगावर सूज. रोजच्या २८/२९ गोळ्या. 

काही दिवसांनी रोग कह्यात आला, संपला नाही. परत उफाळला, कमी जास्त नेहेमीच होत राहिला. प्रकार बदलत होते. छोटी होणारी किडनी, रक्त दाब, मधुमेह हळू हळू सर्वांना जवळ घेत होते. नुकतेच दोन महिन्यापूर्वी पाठीच्या कण्यावर हि शस्त्रक्रिया झाली आहे. ईशकृपेने व डॉ. मुळे सर्व व्यवस्थित !!

सर्व साधारण कुठल्याही SLE रुग्णाची हि व अशीच कहाणी असते. या हि परिस्थितीत मी रोज कामावर जात होते. विद्यार्थ्यांना शिकवत होते, जास्तीच्या जबाबदाऱ्या घेत होते. जगभर प्रवास करत होते, मुले शिकत होती. एखाद्या सर्व साधारण निरोगी माणसाइतकेच छान आयुष्य जगत होते.  इतर गोष्टींप्रमाणे  SLE आयुष्याचा भाग होता - काही वेगळे नव्हते.  लिहिण्याइतके सोप्पे हे नक्कीच नव्हते, पण  घरच्यांची साथ होती. 

मुख्य म्हणजे सर्व गोष्टी डॉ. ना विचारून करत होते. कुठल्याही ताण येणाऱ्या प्रसंगाच्या वेळी डॉ.ना विचारणे महत्वाचे, अगदी मुलाच्या लग्नाच्या वेळीही त्यांचा सल्ला घेतला, त्याप्रमाणे औषधात बदल केले. मी कितीही लोकांनी सल्ला दिला तरी नोकरी - माझी ऍक्टिव्हिटी थांबवली नाही. स्वतःला गुंतवून ठेवल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहिलं. 

डॉ. चे सर्व ऐकले, उन्हात जायचे नाही, नाही गेले. जावं लागलं तर स्वतःला गुंडाळून गेले. नेहेमी सकारात्मक लोकांच्यात वावरले, औषधांच्या वेळा पाळल्या. अगदी पाहुणी म्हणून गेले वा पाहुणे आले तरी सर्वांना सांगून वेळा पाळल्या. घरच्यांना, अगदी मुलांनाही आजाराची कल्पना दिली, त्यांचा सहभाग वाढवला.

हा आजार सोप्पं नाही पण काळजी घेतली तर अवघड हि नाही. 

परिणाम? काही वर्षांपूर्वी मी एका SLE संबंधित संस्थेत गेले तेंव्हा त्यांनी मला आश्चर्याने विचारले," काय तुम्हाला SLE झालाय?, आमचा विश्वास बसत नाही. किती छान आहेत तुम्ही!!"

"हो, मीच SLE पेशन्ट आहे."

सौ. मृदुला देवस्थळे