मनाचा कोपरा

खूप दिवसांपासून घरांत काही सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.आज नाही उद्या करु,असे करुन रोज राहूनच जायचे आणि ठरवले , आज आता स्वच्छता मोहिम राबवायचीच ! शेवटी कंबर कसून आज कोपरा अन् कोपरा स्वच्छ केला.अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या,जळमटं काढलीत,सगळ्या वस्तूंवरची धूळ झटकली,नवीन आणि मोजक्याच गोष्टींनी घरातली शोकेस सजवली.स्वच्छ आणि नीट लावलेले घर, चापून चोपून तेल लावून, तीट लावलेल्या बाळासारखे गोंडस दिसत होते. या विस्कटलेल्या बाळाला आपण किती गोंडस बनवले,अशा स्वतःच्या कौतुकसोहळा करण्यात रममाण झालेल्या मला कधी डुलकी लागली कळलेच नाही.

त्या डुलकीत मी पोहचले माझ्या मनाच्या गांवात ! सहजच गावातून फेरफटका मारता - मारता मला पुन्हा एक अनामिक मनमोहक सुगंध येवू लागला. हा सुगंध नेहमीच यायचा मनाच्या गांवात फिरतांना,पण कुठुन येतोय,याचा मात्र सुगावा लागत नसे.  आज नक्की ठरवले की काही झाले तरी 'सुगंध शोध' पूर्ण करायचाच ! त्या सुगंधाच्या शोधात मी गावांत फिरू लागले. शोध घेता घेता मी एका रानटी झाडे,झुडुपे असलेल्या पडीक अशा जागी येऊन थांबले. ' सुगंध तर इथूनच येतोय! काय बरे असेल इथे? कुठल्या फुलांचा सुगंध इतका आर्कषक असेल? कुणाची बरे असेल ही बाग, इतकी सुगंधित फुलांची बाग अशी कशी पडिक असेल? ' असे अनेक विचार मनात असतानाच न राहवून मी आंतमधे शिरले.

आंतमधे शिरताच मला नावाची पाटी दिसली. पण त्या पाटीवरील अक्षरे धुळीमुळे नाव स्पष्ट दिसत नव्हती. मी मग हातानेच धुळ स्वच्छ केली,जागेचे नाव होते,'मनाचा कोपरा' आणि ती जागा माझ्या मालकी हक्काची आहे, हे बघून अजूनच नवल वाटले.  डोक्यात  १०० प्रश्न येत होते आणि प्रत्येक पावलागणिक उत्सुकता वाढत होती.आतमधे गेल्यावर सगळी जागा अस्वच्छ आणि अस्ताव्यस्त पडली होती. माझ्या मनाच्या कोपऱ्यात दयनीय अशी अवस्था असू शकते , असे कधी वाटले पण नव्हते. मात्र जवळ गेल्यावर दिसले की हा तर माझ्याच आयुष्यातील जमा झालेला कचरा आहे. मलाच कधी तो दिसला नाही कारण या आधी तसा मी खूप शोध पण नव्हता घेतला. तिथे भूतकाळातील जुन्या कटू अनुभवांचा कचरा खाली कुजत पडला होता.. भूतकाळातल्या अपयशांची जळमटे होती, कुठेतरी हेवेदावे आणि ईर्षेचे काटेरी रोपटे होते, कुठे कुणीतरी कधीतरी टोचून बोललेल्या आणि कधीच एक्स्पायर झालेल्या बारीकसारीक वस्तू सारख्याच बोचत होत्या. रुसव्या-फुगव्यांचे गढूळ पाण्याचे डबके जागोजागी होते,खराब झालेले टेपरेकॉर्डर तेच तेच रडके रटाळ गाणे वाजवत होते.....

हे सगळे साफ केल्याशिवाय सुगंधाचा माग लागणे शक्य नव्हते ! इतक्या दिवसांचा कचरा मी एकटीने कसा स्वच्छ करू? या विचारानेच खरं तर हात पाय कधीच गळले होते. पण विचार केला तेव्हा जाणवलं , उमगलं , ही जागा माझ्याच मालकीची आहे ! शिवाय कचराही मीच केला आहे . वर्षानुवर्षे तो साचला होता, कुजला होता , तेव्हा स्वतः साफ केल्याशिवाय पर्याय नाही... तेव्हा 'शुभस्य शीघ्रम्' , असा विचार करुन मी मग नकळत जोशात कामाला लागली !

भूतकाळातील अपयशांची जळमटे काढून तिथे मी भविष्यातील सुंदर स्वप्नांची तोरणे बांधलीत. हेवेदावे आणि ईर्षेचे काटेरी रोपटे काढून सुंदर सुवासिक प्रेमाची रोपटे लावलीत. टोचून बोललेल्या आणि कधीच एक्स्पायर झालेल्या बोचण्यार्‍या बारीकसारीक वस्तू लगेच फेकून दिल्या आणि तेथे गोड, हव्याहव्याशा आणि आल्हाददायक वाटणार्‍यां आठवणींचा सुंदर मखमली गालिचा अंथरला .रुसव्या-फुगव्यांचे गढूळ पाणी  काढून तिथे आपुलकीच्या विहीरीचे स्वच्छ पाणी भरले.आशेच्या हिरव्यागार झाडांना लागलेली निराशेची किड उपटून दूर दूर फेकून दिली. निराशावादी होऊन पूर्वीचे  भविष्याचे काढलेले ते नकोसे चित्र मी लगेच फाडून फेकले.

हे सगळं करता करताच आपसूकच टेप रेकॉर्डरवरचे रडके रटाळ गाणे बंद होऊन आनंदाचे गाणे वाजू लागले. कधीपासून माग घेत असलेल्या दैविक सुगंधाचा शोध संपला.समोरच प्रसन्नता, आत्मविश्वास, प्रेम , आनंदाची फुले छान फुललेली होती. सगळीकडे असलेल्या कचर्‍यांमुळे यांचा सुगंध दबून गेला होता. आता सगळा कचरा निघाल्यावर त्याचा सुगंध अजूनच पसरू लागला....
समाधानाच्या झोपाळ्यावर बसून मी झुलू लागले आणि समोरच भविष्याच्या सुंदर ,रेखीव आणि रंगीबेरंगी रांगोळीकडे बघत बसले...

दारावरची बेल वाजली आणि माझी डुलकी संपली. उठल्यावर कसे खूप हलके आणि प्रसन्न वाटत होते ! त्या अनामिक दैवी सुगंधानं अंतर्मन  न्हाऊन निघालं होतं .आता एकाऐवजी दोन बाळं गोंडस वाटत होती.  लक्षात आलं की , शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपायचे असेल तर नजरेआड असलेले घराचे कोपरे आणि नजरेच्या पलिकडे असलेले मनाचे कोपरे दोन्ही वरचेवर स्वच्छ करायलाच हवेत !

 

संपदा काळीकर
कृष्ण गिरी

सिंगापूर