संपादकीय

नवप्रकाशं नवचैतन्यं नवहर्ष नवसामर्थ्यम्। 
आयातु नववर्षः एषः गृहीत्वा नवमाङ्गल्यम्।
 
'निरामय 'च्या सर्व वाचक, दानदाते,लेखक , रुग्ण , हितचिंतक व संपादकीय मंडळाला गुढीपाडव्याच्या तसेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक,आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या पावन स्मृतीस वंदन करूया.
 
चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच चैत्र पाडवा. नवीन पालवी सोबत  सगळया चराचरात नवचैतन्य संचारते व नव्या उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.याच उत्साहाने' निरामय' चा हा अंक आपल्या पुढ्यात सादर करीत आहोत.
 
पतंग उडवणे म्हणजेच पतंगबाजी ! भारतीय संस्कृतीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुकानातून पतंग विकत आणण्यापासून तर तो पतंग आकाशात गगन भरारी घेईपर्यंतचा सगळा प्रवास उलगडला आहे 'पतंगीचे ते मंतरलेले दिवस' या मनाला अगदी nostalgic करणाऱ्या  लेखामध्ये ! हा लेख वाचताना आपसूकच पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते व पतंगबाजीचा तो रोमांच प्रत्यक्षात घडतोय असाच भास होतो.  हा खेळ नकळतच आपल्याला आयुष्याचे धडे देत असतो. पतंग उंच आकाशी पोहोचवण्यासाठी न थकता करावी लागणारी मेहनत,वाऱ्याचा वेग सांभाळत दोरा ताणून ठेवण्यासाठी लागणारा संयम व धैर्य कधी वारा विरुद्ध दिशेने आला तर त्याही परिस्थितीत न डगमगता, स्वतःला सावरण्याचे सामर्थ्य आणि एकदा का पतंगीने उंच गगनात भरारी घेतली की होणारा उत्स्फूर्त आनंद हे सगळेच किती विलक्षण आणि अपूर्व आहे ! हा सुंदर स्वानुभव शब्दात मांडला आहे सर्जन डॉ. यशोधन बोधनकर यांनी.
 
आयुष्यातल्या चांगल्या वाईट अनुभवांच्या स्मृती मनात साठवून घेत आपण मोठे होत असतो, पण मग कुठेतरी आपल्याला या सगळ्या विचारांची गर्दी जाणवायला लागते. अशा वेळी अंतर्मुख होऊन मनाचा कोपरे धुंडाळून  त्यातील नकारात्मक भाव भावनांना दूर सारून, मन स्वच्छ केले की एक नवीन उत्साह व सकारात्मकता आयुष्यात येते. हे वेळोवेळी आपणच केले पाहिजे, असा मौलिक सल्ला दिला आहे सिंगापूरच्या संपदा काळीकर - कृष्णगिरी यांनी त्यांच्या 'मनाचा कोपरा' या लेखातून.
 
२८ फेब्रुवारी हा दिवस National Rare Disease Day म्हणजेच राष्ट्रीय दुर्मिळ अजार दिवस म्हणून साजरा होतो.काही अनुवंशिक आणि जेनेटिक अशा आजाराविषयी सामान्यांना ज्ञान मिळावे व असा आजार असल्यास पुढे काय करावे याबद्दल जनजागृती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. अशाच दुर्मिळ आजारांपैकी काही आजार ज्यामध्ये जन्मजातच आपल्या रोग - प्रतिकारशक्ती मध्ये त्रुटी आढळून येतात. म्हणजेच Inborn errors of immunity यांच्याबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख समाविष्ट करत आहोत. हा लेख मुंबईच्या 'बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल'मध्ये पेडियाट्रिक इम्युनॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वैष्णवी अय्यंगार यांनी लिहिला आहे.
 
गर्भावस्था ही स्त्रियांच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा काळ! हार्मोन्सच्या बदलांमुळे या काळात शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होत असतात. त्याचबरोबर या काळात मुख आरोग्य सांभाळणे हे माता व बाळाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. गर्भावस्थेतील काही मौखिक आजार व त्यांच्यावरील उपचार याबद्दल दंतोपचार तज्ञ डॉ.साक्षी शहा यांनी माहितीपर लेख लिहिला आहे.
 
कुठलाही पदार्थ खाताना सर्वात आधी आपले लक्ष जाते ते त्याचा रंग,गंध आणि मग स्वाद यावर.या सगळ्यांनी पोटाबरोबर आपले मनही तृप्त होते. पण फळ व भाज्यांना मिळालेले हे रंग,गंध केवळ प्राणीमात्रांना आकर्षित करण्यासाठी नाही तर त्यांचे आपल्या शरीराला आणखी फायदे आहेत. फळ-भाज्यांना हे विशेष गुणधर्म देणारे रासायनिक घटक म्हणजेच फायटो केमिकल्स हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतात व त्यांचे फायदे मिळवण्यासाठी आपल्याला दररोज फळ व भाज्यांचे सेवन करणे अनिवार्य आहे.या फायटो केमिकल्सबद्दल माहिती करून घेऊया आहारतज्ञ प्रा.डॉ. संध्या जोशी यांच्या 'आरोग्यजन्य वनस्पतीज रसायने' या लेखातून.
 
निसर्गतः सुंदर रंग,गंध व स्वाद लाभलेली फळे जशी आरोग्यासाठी हितकारक आहेत याच्याच विपरीत कृत्रिम रंग,फ्लेवर्स आणि भरपूर काळ टिकवून ठेवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह असे पदार्थ वापरून बनवली जाणारी जॅम, जेली, केचअप, फ्रूट ज्यूस इत्यादी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. यांपैकी उन्हाळ्यात जास्त मागणी असणारे पदार्थ म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स,सोडा,फ्रूट ज्यूस इ.! किशोरवयीन मुले व तरुणांमध्ये यांचे विशेष आकर्षण आहे.या सगळ्यांमध्ये असणाऱ्या कृत्रिम घटकांचे आपल्या शरीरावर काय विपरित परिणाम होऊ शकतात, तसेच जाहिरातींना बळी न पडता यांचे सेवन टाळणे किंवा कमी करणे का आवश्यक आहे, हेच सांगतोय 'ये दिल मांगे मोर' हा लेख. बालरोग तज्ञ डॉ. प्रज्ञा बनसोड यांनी हा लेख साध्या, सोप्या भाषेत लिहून आरोग्य जागरण केले आहे.
 
वेगवेगळ्या विषयांनी नटलेला  हा अंक आपल्याला वाचायला नक्कीच आवडेल, अशी आशा करतो ! धन्यवाद.