स्वास्थ बोध 

निद्रायत्तं सुखं दुःखं पुष्टिः कार्यं बलाबलम् । 
वृषता क्लीबता ज्ञानमज्ञानं जीवितं न च ॥३६॥ 
- चरक संहिता, सूत्रस्थान २१ 


सुख, दुःख, पोषण,अशक्तपणा, शक्ती,दुर्बलता, पौरुषत्व, वंध्यत्व, ज्ञान, अज्ञान, जीवन आणि मृत्यू - हे सर्व योग्य किंवा अयोग्य झोपेवर अवलंबून असतात. 

- चरक संहिता, सूत्रस्थान २१/३६


निद्रा म्हणजे झोप. वात, पित्त व कफ याप्रमाणेच आहार, निद्रा व ब्रह्मचर्य यांनाही आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे. आहार, निद्रा व ब्रह्मचर्यरूपी तिपाईवर आपले जीवन आधारलेले असते. म्हणूनच वात, पित्त व कफ यांच्या खालोखाल महत्त्वाचे असलेल्या या तीन घटकांना तीन उपस्तंभ म्हणतात. यापैकी एक उपस्तंभ म्हणजे निद्रा होय.

जेव्हा  मन व सर्व इंद्रिये थकतात त्यावेळी ते स्वत:च्या विषयांपासून निवृत्त होतात व त्यावेळी झोप येते. चांगली व पुरेशी झोप झाल्यास शरीराचे पोषण नीट होते, शरीराचे बळ व वीर्य वाढते, ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढते, आयुष्य वाढते. झोप नीट न झाल्यास मनुष्य रोडावतो, दुबळा, नपुंसक व दु:खी होतो, ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता मंदावते, अल्पवयात मृत्यू येऊ शकतो. तसेच भलत्यावेळी झोपणे, खूप झोपणे यामुळेही आयुष्याची हानी होते.


पुरेशी शांत झोप मिळाल्यास त्याचे शरीरावर होणारे काही सकारात्मक बदल:

१) रोगप्रतिकारक शक्ती: झोपेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते व संसर्ग आणि आजारांशी लढण्यास मदत होते.

२) हृदयाचे आरोग्य:पुरेशी झोप मिळाल्याने हृदयची गती व लय नियमित होते तसेच हृदयरोग,उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

३)चयापचय:भूक आणि चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स नियंत्रित करण्यात झोप भूमिका बजावते, ज्यामुळे पचन सुधारते व वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

४) शारीरिक वाढ व झीज भरून काढणे : झोपेत शरीरातील स्नायूंच्या वाढीस आणि दुरुस्तीस चालना देणारे हार्मोन्स तयार होतात.

५) मानसिक आरोग्य: १८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.त्यामुळे दैनंदिन चिडचिड ,थकवा, ताण-तणाव कमी होतो तसेच उत्साह आणि  कार्यक्षमता वाढते.संवाद कौशल्ये वाढून सामाजिक संवाद आणि नातेसंबंध सुधारू शकतात,झोपेच्या कमतरतेमुळे येणारी तंद्री आणि थकव्यामुळे गाडी चालवताना अपघातांचा धोका वाढतो,पुरेशी झोप मिळाली तर हा धोकाही कमी होतो.

शांत झोप येण्यासाठी उपाय:
शांत वातावरण:
झोपायच्या आधी खोली थंड, अंधारी आणि शांत ठेवा. 

स्क्रीनचा वापर टाळा:
झोपण्यापूर्वी मोबाईल, टॅब्लेट किंवा टीव्हीसारख्या स्क्रीनचा वापर  किमान दोन तास आधी बंद करा. 

शांत संगीत किंवा निसर्गाचे आवाज: 
हेडफोन्सने शांत संगीत किंवा निसर्गाचे आवाज ऐका. 

गरम दुध:
झोपण्यापूर्वी गरम दुध प्या. 

शांतता:
झोपण्यापूर्वी काही वेळ शांत बसून ध्यान करा किंवा श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा. 

नियमित झोप:
दररोज एकाच वेळेस झोपायला जा आणि उठायला या. 

व्यायाम:
नियमित व्यायाम करा, पण झोपायच्या आधी जास्त व्यायाम करणे टाळा. 

आरामदायी झोप:
झोपण्यासाठी योग्य पलंग, तक आणि उशी वापरा. 

ताण कमी करा:
झोपण्यापूर्वी ताण कमी करण्यासाठी योगा, ध्यान किंवा इतर आरामदायक क्रिया करा. 

कॅफीन आणि जड जेवण टाळा:
झोपायच्या आधी कॅफीन आणि जड जेवण टाळा.