आरोग्यजन्य वनस्पतीज  रसायने

निसर्गाने मानवासाठी विविध प्रकारचे अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक देश किंवा प्रांतामधली पारंपारिक आहार पद्धती त्या-त्या ठिकाणचे हवामान, माती,पर्जन्यमान यांना अनुसरून रूढ झालेली असते. या आहारात प्रथिने,कर्बोदके, स्निग्ध पदार्थ,जीवनसत्वे आणि खनिजे असतात, हे साधारणपणे सगळ्यांनाच माहिती आहे.परंतु या पोषक घटकांव्यतिरिक्त रंग आणि स्वाद देणारे घटक असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फळे आणि भाज्यांमध्ये देखील ही रसायने असतात. ही रसायने आरोग्यजन्य आणि जैविकदृष्ट्या कार्यक्षम असून केवळ वनस्पतीच त्यांची निर्मिती करू शकतात.
आरोग्यजन्य वनस्पतीज रसायने अशी जैविक, कार्यक्षम, वनस्पती निर्मित संयुक्त रसायने आहेत की ज्याचे उपयोगाने वनस्पती फंगस, बॅक्टेरिया, कीटकांपासून स्वतःचे रक्षण करतात. या रसायनांना ”फायटोकेमिकल्स “म्हणतात. ही रसायने ५००० प्रकारची असतात. ही रसायने आहारातील भाज्या आणि फळांमार्फत मानवाला मिळतात.

वनस्पतीज रसायनांची शरीरातील भूमिका आणि कार्य -

ही रसायने शरीरातील अनेक घडामोडींमध्ये प्रमुख भूमिका निभवतात.

१) पेशींचे आरोग्य चांगलं राखून त्यांची सलगता कायम राखणे .त्यांची तोडफोड होऊ न देणे.

२) अंतर्गत आणि बहिर्गत शरीरावरील सूज कमी करण्यासाठी आणि हृदयावर येणारी सूज कमी करण्यासाठी मदत करणे.

३) कॅन्सरमध्ये या पेशींना नष्ट करणे आणि या रोगाच्या पेशी विभाजनाला अटकाव करणे.

४) शरीरातील बॅक्टेरिया आणि फंगस यांना अटकाव करणे.

५) ही रसायने पेशींवर चिकटून राहत असल्यामुळे हानिकारक सूक्ष्मजीव हल्ला करू शकत नाहीत. अंतर्गत त्वचा सुरक्षित राहिल्याने मूत्रनलिका, श्वासनलिका आणि अन्ननलिकात होणारा जंतुसंसर्ग नियंत्रित करणे.

६) कॅन्सर या रोगात डीएनएमध्ये कार्सिनोजिन्स तयार होतात आणि बदल घडवितात. डीएनएला पूर्वस्थितीत आणण्यासाठी ही रसायने महत्त्वाची भूमिका बजावतात.

७) कॅन्सर पेशी तयार करणारे नायट्रोझेमाईन शरीरात जास्त प्रमाणात तयार होत असेल तर त्याला प्रतिबंध करणे. यात पानकोबी, रसाळ फळे आणि चेरीमधील रसायने महत्त्वाची भूमिका बजावतात.

८) फायबर्स(अन्नातील तंतुमय पदार्थ) जे पाण्यात द्राव्य (विरघळणारे) नसतात, त्यांना अद्राव्य तंतु असेही म्हणतात. हे देखील वनस्पतीजन्य रसायनेच आहेत. हे तंतुमय पदार्थ कोलेस्टेरॉलचे पातळी वाढू देत नाहीत.

९) शरीराचे कार्य सुरळीत राखण्यासाठी प्राणिदीभवनाची क्रिया संतुलित राहायला हवी. मानवी शरीरात हवा, पाणी, अन्न यांच्यामार्फत अनेक दुषके प्रवेश करतात.त्यामुळे जो ताण निर्माण होतो त्याला “ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस” असे म्हणतात. यामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिडंट्स तयार होतात.विशेषतः जंतू संसर्गामुळे हा ताण वाढून मुक्त मुलके तयार होतात.या हानिकारक फ्री रॅडिकल्समुळे शरीर विविध रोगांना लवकर बळी पडते. शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. असंसर्गजन्य रोग उदा. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब वाढीला सामोरे जावे लागते. या फ्री रॅडिकल्सना नियंत्रित व नष्ट करणे हे कार्य वनस्पतीजन्य रसायने करतात.

थोडक्यात म्हणजे मानवी शरीरात जैविक रसायने महत्त्वपूर्ण आहेत.यासाठी फळे आणि विविध भाज्यांची योग्य प्रमाणात निवड करणे आवश्यक आहे.
विविध जैविक रसायनांच्या प्राप्तीची साधने-

१) पॉलीफिनॉल फेव्हनॉइड्स- लाल कांदे, ब्रोकोली, जांभळी द्राक्ष, चहा, सफरचंद, बीन्स, शेंगदाणे,बोरे, बेरीज, चॉकलेट्स .

*नॉन फ्लेव्होनॉइड्स- हळद, द्राक्ष, जवस, तीळ, शेंगदाणे, बेरीज, बीन्स.
*फिनॉलिक ऍसिड- डाळिंब,चहा, काळी भाजी, पानकोबी, कुट्टू, कोको,गव्हाचे आवरण,दालचिनी,किवी,ब्लूबेरी फळे, दारू, हळद, जवस, तीळ .

२) टर्पेनॉइड्स-
*कॅरोटेनॉइड्स - सर्व प्रकारच्या लाल,तांबड्या,हिरव्या भाज्या आणि फळे .
*नॉन कॅरेटोनाईड्स –सोयाबीन,पुदिना,धान्ये (वरील आवरणासकट)काळी द्राक्षे,  सफरचंद, बदाम,खसखस,काळी मनुका

३) थिओल- मुळा, ब्रोकोली, फुलकोबी,पानकोबी, मोहरी

४) हर्ब्ज- एलोवेरा, लेमन चहा, लिंबाची पाने,अळीव,गवती चहा,तुळस, जिनसिंग.

५) इतर -बीट, ढोबळी, मिरची, काळी,  अपचनीय तंतुमय पदार्थ (जे पाण्यात विरघळत नाहीत) यापैकी कोणतेही रसायन स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. यामुळे सर्वच प्रकारची वनस्पतीजन्य जैविक रसायने आहारात असलीच पाहिजेत.  अ‍ॅक्रोइड हा शास्त्रज्ञ सांगतो की,  तुमच्या आहारात जिवंत वाढणारे, रंगीबेरंगी, विविध स्वादाचे, विविध आकाराचे अन्नपदार्थ समाविष्ट करा. त्यासाठी इंद्रधनुषी आहार म्हणजे ता ना पि ही अ नि जा असे विविधरंगी वनस्पतीजन्य पदार्थ, विशेषतः फळे आणि भाजीपाला उपयोगात आणावा.


डॉ. संध्या जोशी
आहार विशेषज्ञ