गर्भावस्था आणि मौखिक आरोग्य

शारीरिक आरोग्य हे महत्वाचे असते व त्याची काळजी आपण नेहमीच घेत असतो .परंतु शारीरिक आरोग्याचा आरसा म्हणजे  मौखिक आरोग्य ! याबद्दलची जागरूकता तितकीच असणे आवश्यक आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मौखिक आरोग्यात बदल घडून येतात. थोडक्यात मौखिक आरोग्याचे देखील वेगवेगळे टप्पे आहेत. लहान असताना दुधाचे दात  येतात , नंतर  ते पडतात  व काही  कायमचे दात यायला सुरुवात होते. संपूर्ण कायमचे दात मग अक्कल दाढ येणे, गर्भावस्थेत  हॉर्मोन्स मूळे होणारे  बदल तसेच प्रौढ अवस्थेत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावर पडतो. थोडक्यात शारीरिक आरोग्य आणि मौखिक आरोग्य हे परस्पर एकमेकांवर अवलंबून असतात.

आजच्या या लेखामध्ये गर्भावस्थेत होणारे मौखिक बदल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
गर्भधारणेत संपुर्ण शरीरात वेगवेगळे बदल होतात व दात , हिरड्या यांच्यातही अनेक बदल होतात असे बदल होण्याची प्रमुख कारणे:

१)    हार्मोनल चढ उतार : इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे हिरड्या अधिक संवेदनशील होतात आणि सुजतात . हे  हॉर्मोन्स हिरड्यांमधील रक्त प्रवाह वाढवू  शकतात.ज्यामुळे हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव होण्याचा संभव असतो.


२)    मळमळ आणि उलट्या : मॉर्निंग सिकनेस म्हणजेच सकाळच्या वेळी मळमळ व उलटी होणे ही एक अतिशय सामान्य पणे आढळणारी समस्या आहे. यामुळे पोटातील आम्ल दातांच्या संपर्कात येते आणि  इनॅमलची झीज होते. दात कीडण्याचा धोका वाढतो. तसेच मॉर्निंग सिकनेसमुळे ब्रशिंग करण्याची इच्छा होत नाही आणि दातांवर प्लाक जमा होवू शकते.


३)    झेरोस्टोमिया : (लाळ कमी प्रमाणात तयार होणे) तोंडात लाळ कमी प्रमाणात तयार झाल्याने तोंडाची नैसर्गिक स्वच्छता क्षमता कमी होवू शकते . ज्यामुळे बॅक्टेरियाची वाढ  होऊन दातांना कीड लागण्याचा धोका वाढतो. तसेच तोंडातून दुर्गंधी देखील येऊ शकते.


४)   प्रेग्नन्सी ट्युमर : ज्याला पायोजेनिक ग्रॅन्युलोमा किंवा ग्रॅन्युलोमा ग्रॅव्हिडेरम असेही म्हणतात, ही हिरड्यांवर होणारी सौम्य, ट्यूमरसारखी दिसणारी वाढ आहे जी गर्भधारणेदरम्यान होऊ शकते, या गाठीमुळे हिरड्यांवर सूज येते, वेदना होतात तसेच रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

गर्भधारणा काळात मौखिक आरोग्यात बदल :

१) जिंजायवायटीस(Gingivitis): म्हणजेच हिरड्यांना आलेली सूज . इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीमुळे हिरड्यांना सूज येते. ६० ते ७० % गर्भवती महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. यावर वेळीच उपचार न केल्यास ही समस्या अजून वाढू  शकते.

लक्षणे:
*लालसरपणा आणि सूज
 हिरड्या संवेदनशील होणे
 ब्रश करताना हिरड्यातून रक्त येणे.
 हिरड्यांना सुजेमुळे चकाकी येणे.

२) पेरिओडोन्टायटिस(Periodontitis): Gingivitis साठी वेळीच उपचार घेतले नाही तर त्याची पुढची स्टेज म्हणजे periodontitis. यात हिरड्यांचे इन्फेक्शन होऊन दातांची मुळाशी पकड कमकुवत होते. हिरड्या ढिल्या पडतात . त्यामुळे दात हलायला सुरुवात होते.

३) टुथ इरोजन(Tooth Erosion ): मॉर्निंग सिकनेस म्हणजे पहिल्या काही महिन्यांमध्ये गर्भवती महिलांना उलट्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटातले आम्ल वर येते. Enamel  ( Hardest part of tooth  )या आम्ल पदार्थांच्या संपर्कात आले असल्यास त्याची झीज होते. त्यामुळे sensitivity  चा  त्रास होवू शकतो अथवा वाढतो.

४) दात लूज पडणे : वाढलेल्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीमुळे दातांना असलेली हिरड्यांची आणि हाडांची पकड ढिली  होते. त्यामुळे दातांना काही दिवस ढिलेपणा येवू शकतो.

५) कीड लागणे (Cavities) : गर्भावस्थेत मौखिक आरोग्याची नीट काळजी न घेतल्यास दाताना कीड लागण्याची शक्यता असते. तसेच काही दातांना आधीच कीड लागलेली असल्यास ती अजून वाढते.त्यात असलेल्या बॅक्टेरियाने होणाऱ्या बाळावरही परिणाम होवू शकतो.

६) Pregnancy Tumours (Pyogenic Granuloma) पायोजेनिक ग्रॅन्युलोमा ही त्वचेवर वाढलेली , कर्करोग नसलेली गाठ असते.ती बहुतेक वेळा गर्भधारणा,औषधे  आणि त्वचेला झालेल्या दुखापतीशी संबंधीत असते. या गाठीमुळे घास चावताना त्रास होऊ शकतो, वेदना होऊ शकतात तसेच पायोजेनिक ग्रॅन्युलोमामधून रक्तस्त्राव होवून  त्या सहजपणे फुटतात यामुळे गुंतागुंत वाढू शकते.

गरोदरपणात मुखारोग्य कसे राखावे :
1) तोंडाची स्वच्छता : फ्लोराइड असलेल्या tooth पेस्टने दिवसातून दोनदा दात घासावे. 

तुमच्या दंत वैद्याला नियमित भेट द्या. मर्यादित प्रमाणात आम्लता आणि साखरेसह संतुलित आहार घ्या. उलट्या झाल्यावर पाण्याने किंवा फ्लोराइडयुक्त माउथ वॉशने तोंड धुवा. अँटी मायक्रोबियल माउथ वॉश वापरा. अल्कोहोल असलेले माउथ वॉशचा वापर टाळा . अन्न आणि प्लाक काढून टाकण्यासाठी दिवसातून एकदा फ्लॉस करा.

2) आहार : निरोगी आहार घ्या.
*जास्त साखर असलेले पदार्थ आणि पेये मर्यादित करा . तंबाखूजन्य पदार्थ टाळा, अल्कोहोल कमीत कमी करा अथवा टाळा . कच्ची फळे आणि भाज्या ,दही किंवा चीज या सारखे पौष्टीक पदार्थ आहारात घ्या. किवी,  स्ट्राॅबेरी आणि संत्री यासारखे व्हिटामिन सी जास्त असलेले पदार्थ खा. बीटा कॅरोटीन जास्त असलेले पदार्थ खा. उदा. गोड बटाटे , केळ आणि ब्रोकोली .

३) दंतवैद्याच्या भेटी

दर ६ ते १२ महिन्यांनी तुमच्या दंतवैद्याला भेट द्या. तुम्ही गर्भवती आहात याची दंत वैद्याला कल्पना द्या. गर्भवती  असल्याचे नेहमीच स्मरण डॉक्टरांना देत राहा. विशेषतः एक्सरेची आवश्यकता असल्यास . दातांची नियमित स्वच्छता करा.

इतर टिप्स
- गर्भवती  राहण्याआधी किंवा आई होण्याचे नक्की ठरवीत असताना दातांशी निगडीत कोणतीही समस्या असल्यास त्वरित दंत वैद्याशी संपर्क साधा.

गर्भ राहण्या आधी उपचार केलेले कधीही उत्तम.
*दात संवेदनशील असल्यास संवेदनशील दातांसाठी खास बनविलेली tooth पेस्ट वापरा.

गर्भधारणे दरम्यान -
दंत उपचारांदरम्यान औषध घेताना दक्ष रहा

दंत प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही औषधांचा, ज्यामध्ये काही अँटिबायोटिक्स आणि वेदनाशामक औषधांचा समावेश आहे. गर्भासाठी त्यांचा संभाव्य धोका विचारून घ्या.मुख्यतः पहिल्या काही महिन्यात बाळाच्या अवयवांचा विकास होत असतो.

भूल देताना :
लोकल ऍनेस्थेशिया देण्याचे औषध सामान्यतः  सुरक्षित मानले जात असले तरी बाळाला होणाऱ्या संभाव्य धोक्यामुळे गर्भधारणे दरम्यान अधिक क्षमतेच्या  वेदना कमी होणाऱ्या औषधांची आवश्यकता असलेल्या मोठ्या प्रक्रिया टाळू शकलो तर टाळणे चांगले असते .
एक्सरे एक्स्पोजर :योग्य शिल्डिंगसह नियमित दंत एक्सरे सुरक्षित मानले जातात .परंतु काही प्रॅक्टिसनर्स गर्भधारणेच्या दरम्यान , विशेषतः पहिल्या तिमाहीत ते पुढे ढकलू शकतात.


स्थान नियोजन समस्या : गर्भधारणेच्या उत्तरार्धात जास्त काळ पाठीवर झोपल्याने अस्वस्थता आणि व्हेना कावावरील दाबामुळे रक्तादाबाशी संबंधित संभाव्य गुंतागुंत होवू शकते.

त्या ऐवजी काय करावे?

१) तुमचे  दंतवैद्य आणि प्रसूती तज्ञाचा सल्ला घ्या.तुमच्या गर्भवती असल्याबद्दल त्यांना सांगा.त्यामुळे ते सर्वात सुरक्षित उपचार पर्यायांबद्दल सल्ला देवू शकतील.

२) प्रतिबंधात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. नियमित ब्रशिंग, फ्लॉसिंग करा आणि मऊ दाताचा टूथब्रश वापरा.
 
३) दुसऱ्या तिमाहीत दातांचे उपचार करण्याचे वेळापत्रक तयार करा.शक्य असल्यास , दुसऱ्या तिमाहीत जेव्हा बहुतेक धोके कमी मानले जातात तेव्हा नियमित दंत स्वच्छता करा.

४) तत्काळ समस्या सोडवणे   : जर तुम्हाला तीव्र वेदना किंवा संसर्गासारखी दंत आपात्कालीन स्थिती जाणवत असेल तर उपचार घेण्यास अजिबात संकोच करू नका. कारण या समस्येचे व्यवस्थापन आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

 

डॉ.साक्षी शाह

दंत रोग तज्ञ