ये दिल मांगे मोर 

उन्हाळा सुरू झाला की उष्णता वाढू लागते. शाळांना सुट्ट्या लागतात. लग्न सराई, छोटे-मोठे कार्यक्रम, सुट्टीतील सहली या सगळ्यांचे आयोजन शक्यतो उन्हाळ्यातच होत असते. असे असताना आपण बराच काळ घरापासून दूर राहण्याचा संभव असतो.या वातावरणात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच बऱ्याचदा पाहुणचार म्हणूनही शीतपेयांचा सर्रास वापर होतो. यामध्ये पारंपरिक शीतपेयांपेक्षा सहज उपलब्ध होणारे बाटलीबंद कोल्ड्रिंक्स,एनर्जी ड्रिंक्स, फ्रुट ज्युसेस, सोडा यांचा पर्याय अधिक सोपा व सुलभ वाटतो. आजकाल लग्नकार्यात वेलकम ड्रिंक म्हणूनही या पेयांचा वापर वाढला आहे. खेळाचे मैदान असो की जिम, घरीच क्रिकेटची मॅच बघणार असू किंवा सिनेमाला जाणार असू, एखाद्याचा वाढदिवस असो की रिझल्टची पार्टी कोल्ड्रिंक्स सगळीकडे हवेच ! अगदी बर्गर, पिझ्झा खातानाही कोल्ड्रिंक सोबत कॉम्बो पॅक हवेहवेसे वाटतात. आता तर कोल्ड्रिंकशिवाय कुठलेही सेलिब्रेशन अपूर्ण आहे, असेच वाटायला लागले आहे. बरं, ही कोल्ड्रिंक्स फक्त उन्हाळ्यातच मिळतात असं नाही, ती बारमाही मिळतात आणि त्यांचे सेवन केले जाते. या सगळ्यांचाच परिपाक म्हणून शीतपेयांचा वापर मागच्या दशकात फार झपाट्याने वाढला आहे. यात जाहिरातींचा ही मोठा वाटा व परिणाम आहे. हे कृत्रीम शीतपेय सेवन करणाऱ्यामधे जवळपास ४० % प्रमाण हे किशोरवयीन मुला-मुलींचे आहे. हे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यांच्या भावी आरोग्याच्या दृष्टीने या कृत्रिम शीतपेयांचा आहारात समावेश हा खरोखरच चांगला आहे का? मित्रांबरोबर सहज मौजमजा म्हणून घेतले जाणारे हे ड्रिंक त्यांच्या आरोग्यावर काय दुरोगमी परिणाम करू शकते, याचा विचारही आता करायला हवा.
 

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा तसेच तरतरी यावी, यासाठी पारंपारिकरित्या आपल्याकडे काही शितपेयांचा वापर होतो ज्यामध्ये लिंबू पाणी, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, उसाचा रस, नारळ पाणी, मसाला ताक, लस्सी, वाळ्याचे सरबत व थंड दूध ई.चा वापर आपण करतो.ही सगळी पेये नैसर्गिक आहेत व त्यात कुठलेही कृत्रिम रंग किंवा चव वाढवण्यासाठी कोणतेच अन्य घटक समाविष्ट नसतात. तसेच या पेयातून केवळ उर्जाच नाही तर शरीराला लागणारे क्षार आणि इतर जीवनसत्त्वे सुद्धा मिळतात. त्यामुळे या पेयांचं आपण रोज सेवन जरी केलं तरी त्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होत नाही, पण या उलट कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा फ्रूट ड्रिंक्स तसेच जिममध्ये वापरले जाणारे स्पोर्ट ड्रिंक यामध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण असते. त्याला विशिष्ट रंग, चव मिळावा व ते बराच काळ टिकावे म्हणून त्यात कलरिंग एजंट्स, प्रिझर्वेटिव्हस् यांचा भरपूर वापर केलेला असतो यामुळे अतिसेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरतात.

कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा सोडा / सॉफ्ट ड्रिंक्स यातील मुख्य घटक:

१. कॅफेन: कॅफेनचा वापर बऱ्याचशा कार्बोनेटेड ड्रिंकमध्ये होतो. त्याचा थेट परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होत असतो. त्यामुळे आपल्याला शांत झोप येत नाही, पोटात जास्त प्रमाणात आम्ल निर्माण झाल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो, तसेच स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्या आकुंचन पावतात. याचा परिणाम त्यांच्या मासिक पाळीवर होतो.कॅफेनेटेड ड्रिंक्सचा वापर जर नियमित करत असलो तर आपल्या हृदयाची गती वाढणे,हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे तसेच स्तनांमध्ये गाठ आणि काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा नाश ई. परीणाम दिसू शकतात.

२. कार्बन डाय-ऑक्साइड : कॉर्बोनेटेड सोडामध्ये कार्बन डाय-ऑक्साइडचा वापर होतो. कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू वनस्पतींसाठी जरी चांगला असला तरी मानवासाठी तो घातकच असतो. 

३. आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा कृत्रिम शर्करायुक्त पदार्थ: यामध्ये फ्रुक्टोज,कॉर्न सिरप,सुक्रोज यांचे प्रमाण अधिक असते.

४. आम्ल : अशा कृत्रिम शीतपेया मध्ये ऍसिडिटी रेग्युलेटरचा वापर अधिक होतो.तोंडातील जिवाणू अतिशर्करेच्या संपर्कात आल्याने त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन तोंडात आम्ल निर्माण होते. याबरोबरच फॉस्फरिक ऍसिड, कार्बोनिक ॲसिड इत्यादींचा समावेश असतो. या सगळ्यांमुळे दातांवरील इनॅमलचा थर नष्ट होऊन, दाताचे आजार वाढतात. तसेच आम्लपित्ताचा त्रासही सुरू होतो.

५. पाणी : कारखान्यात कृत्रिम शीतपेयं बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे बऱ्याचदा निर्जंतुकीकरण न करता अस्वच्छ रूपातदेखील वापरले जाऊ शकते.

 

शीतपेयांचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम 

१. मुख-आरोग्य : दातांवरील चकाकदार इनॅमलचे आवरण अतिरिक्त आम्लामुळे झीजते व अति शर्करेमुळे दातांना लवकर कीड लागते. 

२. चयापचय संस्था: अतिवापरामुळे आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.गॅस होणे, मळमळल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणें दिसून येतात.

३. यकृत: कार्बोनेटेड ड्रिंक/ सोडा ड्रिंक/ डाएट सोडा / एनर्जी ड्रिंक्स या सर्वांमध्येच अती प्रमाणात शर्करा वापरलेली असते.या अतिशर्करेचे यकृतांमध्ये जाऊन चरबीमध्ये रूपांतर होते व ती यकृतामध्ये साठवली जाते. अशा पेयांचे सेवन दररोज केल्यास अतिरिक्त चरबी यकृतामध्ये जमा होऊन फॅटी लिव्हर म्हणजेच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज(NAFLD )हा आजार होतो. तसेच या नंतर आजाराची तीव्रता वाढल्यास लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर मधे रूपांतरदेखील होऊ शकते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने दररोज मद्यपान केल्याने जसे बदल यकृतात होतात, तसेच बदल दररोज डाएट सोडा किंवा कोल्ड्रिंकचा वापर केला तरीही दिसून येतात. त्यामुळे हे सोडा ड्रिंक्स लिव्हरसाठी अतिशय धोकादायक आहेत.

४. किडनी किंवा मूत्रपिंड : कोल्ड्रिंक्समधील विशेषत: कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये असणाऱ्या फॉस्फोरिक ऍसिडमुळे किडनीवरचा कार्यक्षमतेचा भार वाढतो. तसेच या कोल्ड्रिंक्समुळे आपल्या हाडातील कॅल्शियम बाहेर पडते व रक्तात आलेले अतिरिक्त कॅल्शियम किडनीत जमा होऊन किडनी स्टोन्स म्हणजे मुतखड्याचा त्रास सुरू होतो.

५. हाडे:कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे आपल्या हाडातील कॅल्शियम बाहेर पडून हाडे ठिसूळ होतात ज्याला आपण ऑस्टिओ- पोरोसिस असे म्हणतो. हाडे ठिसूळ झाल्यामुळे ते लवकरच फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

६. लठ्ठपणा : म्हणजेच ओबीसीटी ही नवीन काळात निर्माण झालेली एक गंभीर समस्या आहे. सॉफ्ट ड्रिंक /कोल्ड्रिंक मधील अति शर्करेमुळे आपल्याला लठ्ठपणा येतो. लठ्ठपणामुळे दैनंदिन आयुष्यात आपल्याला बऱ्याच अडचणी येतात व त्याचा मानसिक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होतो.

७. फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमता: कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा ड्रिंकच्या अतिवापरामुळे स्त्री व पुरुषांच्या, दोहोंमध्येही प्रजनन क्षमता कमी झालेली आढळून आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येणारा लठ्ठपणा व त्यामुळे होणारे हार्मोनल बदल. शरीराचा बदललेला पीएच आणि यातील कृत्रिम घटक. 
स्त्रियांमध्ये या ड्रिंक्समुळे वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स यामुळे पी. सी. ओ. एस. चा त्रास होतो. त्याचा थेट परिणाम ओवरिज म्हणजेच बीजांडावर होऊन ओव्युलार इनफर्टिलिटीचा धोका निर्माण होतो. ज्या स्त्रिया नियमितपणे सोडा ड्रिंक किंवा कोल्ड्रिंकचे सेवन करतात त्यांच्यामध्ये गर्भधारणा राहण्याची शक्यता जवळजवळ २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच यातील कॅफेंनमुळे गर्भाशयाचा रक्तपुरवठा देखील कमी होऊन मासिक पाळी मध्ये अनियमितता निर्माण होते. 

पुरुषांमध्ये जे लोक नियमितपणे सोडा ड्रिंकचा वापर करतात त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे, शुक्राणूंची मोटिलिटी म्हणजे हालचाल कमी होणे इत्यादी परिणाम दिसतात. यामधील आम्लयुक्त घटकांमुळे पीएच मध्ये बदल होऊन त्यांच्या प्रजनन क्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो.सोडा ड्रिंक तर बहुतेक प्लास्टिक बॉटलमध्ये येतात. त्यामध्ये असणारे बीपीए म्हणजेच बिसफिनॉल ए या घटकामुळे देखील शुक्राणूंची संख्या कमी होते


८. त्वचा : अतिरिक्त सोडा ड्रिंक किंवा कोल्ड्रिंकच्या वापरामुळे आपण जीवनसत्वांनी भरपूर आहार कमी घेतो ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर पडतो.त्वचा कोरडी होणे,जखम लवकर भरून न येणे, ई. परिणाम जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होतात.
 वरील सगळ्या माहितीवरून हाच निष्कर्ष निघतो की, स्पोर्ट ड्रिंक/ डाएट सोडा/ फ्रुट ड्रिंक किंवा कार्बोनेटेड ड्रिंक या सगळ्यांमध्ये असणारे घटक हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावरच परिणाम दिसून येतो. त्यामुळे अशा पेयांचा नियमित व अतिवापर करणे आपण कटाक्षाने टाळायला हवे. याला पर्याय म्हणून अगदी सहज उपलब्ध होणारी व आपल्या आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या आपल्या पारंपारिक पेयांचा वापर आपण वाढवायला हवा.
कुठलाही आनंद साजरा करताना आपले आरोग्य धोक्यात आणणे जरुरी नाही व आपण त्यासाठी चांगल्या पर्यायांना आपण निवडू शकतो, अशी शिकवण आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे.

चला तर मग या उन्हाळ्यात सॉफ्ट ड्रिंक/ सोडा ड्रिंक या सगळ्यांचा वापर कमीतकमी करून आपल्या नैसर्गिक व पारंपरिक शीतपेयांच्या मदतीने हा उन्हाळा सुकर,सुसह्य व आरोग्यदायी होईल असे बघूया.

 

डॉ. प्रज्ञा बनसोड