संपादकीय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आषाढ शुद्ध प्रतिपदा - हा अंक देखील निरामय १२ प्रमाणे सॉफ्ट कॉपी च्या स्वरूपातच वाचकांच्या हाती देत आहो. अनिश्चिततेची जाणीव मागील तीन- चार महिन्यांपासून आपल्याला सवयीची झाली आहे, एकूण अशा परिस्थितीत निरामय चा छापील अंक हातात न पडणे ही गोष्ट खूप मोठी नव्हे. मोठी गोष्ट तर ही आहे की , अशा अकल्पित परिस्थितीमध्ये आपल्या विचारांना आणि भावनांना शब्दात मांडून वाचकांनी या अंकाच्या लेखकांची भूमिका पार पाडली आहे! सर्वप्रथम, यासाठी संपूर्ण संपादकीय मंडळाकडून  सर्वांचे खूप खूप अभिनंदन! 

     अखिल मानवजातीला  ' पराधीन आहे जागती, पुत्र मानवाचा! ' या सत्याचा निर्दय प्रत्यय घ्यावा लागला. हे संकट संपूर्ण जगावर आले आणि अव्याहतपणे धावणारी मानवी महत्वाकांक्षेची चाके जिथल्या तिथे थांबून गेली. अक्षरशः करोनाने प्रभावित झाला नाही असा कोणताही देश, समाज, परिवार, व्यवसाय, व्यक्ती काहीच कुठेही राहिले नाही!! जिवावरचे संकट ,  त्यापासून बचाव करण्यासाठी झालेला लॉकडाउन , आर्थिक मंदी सगळे इतके विचित्र की आपण किती मोठ्या स्थित्यंतराचे साक्षीदार होत आहो, याचे आकलन सुद्धा आपल्याला  पुरते झाले नाही. अशा वेळी मनात भय, चिंता, हुरहूर, भक्ती, वैराग्य, जुन्या आठवणी, विरंगुळ्याचा आनंद, एकत्र असण्यातला निवांतपणा या आणि अशा इतर अनेक भावनांनी स्वाभाविकच गर्दी केली. या मनःस्थितीचे प्रत्येकाने टिपलेले शब्दचित्र ही या काळाने निर्माण केलेल्या परिस्थितीची महत्वाची नोंद आहे. त्यामध्ये समाजमनाचे प्रतिबिंब आहे, कालानुरूप झालेले चिंतन आहे. आपण या संकटकाळातून पूर्णपणे बाहेर पडणार ही आशा आपल्याला आहेच, पण त्याला अजून किती काळ लागेल हे मात्र सांगणे कठीण आहे. पलीकडे गेल्यावर मागे वळून पाहताना जे दिसेल, वाटेल, समजेल ते अजून वेगळे असू शकेल पण प्रत्यक्ष वादळातून वाट काढत असतानाच्या लाटेलाटेवरचा अनुभव हा खरा मनाचा आरसा!! या दृष्टीने, या अंकातील प्रत्येक लेख माझ्या लेखी महत्वाचा आहे. 

     आता आपण 'अनलॉक ' मध्ये प्रवेश केला आहे. पण काळजी घेण्याची गरज मात्र वाढली आहे. त्यासंबंधी सूचना आपण सतत ऐकत आहो. डॉक्टर म्हणून त्याचे महत्व अधोरेखित करणे ही माझी जबाबदारी आहे, तेव्हा सावधगिरीच्या सूचनांचे पालन करण्याचे सर्वांना आवाहन करते. 

     अनेक दृष्टीने, अनेक पातळ्यांवरून विचार करता ही एक नवीन सुरुवात असणार आहे. व्यक्तिगत भौतिक आणि अध्यात्मिक विकासापासून ते 'आत्मनिर्भर ' देशापासून आणि तिथूनही पुढे धर्माधिष्ठित जागतिक व्यवस्था निर्माण कारण्यापर्यंतच्या खूप उत्तुंग कार्याची बीजे या संकटाने केलेल्या उलथापालथीत आहेत. या परिस्थितीकडे डोळसपणे आणि जाणिवांच्या कक्षा रुंदावून पाहूया आणि सर्वांच्या निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करूया!!

डॉ. मानसी कविमंडन