आपल्या हृदयाविषयी माहिती

आपल्या हृदयाविषयी माहिती

प्रश्न – हृदय रोगाचा धोका कोणाला अधिक असतो ?
डॉक्टर– हृदयरोगाचे प्रमाण आपल्या देशासह पूर्ण जगात वाढले आहे. भारतात दर वर्षी ३५ लाख लोक हार्ट अटॅकने दगावतात . आजकाल तर याचे प्रमाण तरुण वयातही वाढले असून अगदी २५-३० वर्षाचे तरुणही याला बळी पडत आहेत. हृदयरोगांच्या धोक्यात प्रामुख्याने डायबीटीस व उच्च रक्तदाब असलेलेले व्यक्ती अधिक असतात. म्हणून अशा आजारांची नियमित तपासणी आणि निर्देशित औषधोपचार नियमित घेणे अत्यावश्यक आहे. तसेच कुठल्याही प्रकारचे तंबाखू सेवन किंवा मद्यपान हृदयासाठी नुकसानदायक आहे. अशा रोगांना दूर ठेवण्याकरिता नियमित झोप जरुरी आहे. आहारात जंक फूडचे वाढलेले प्रमाण आणि शारीरिक हालचालींचा अभाव आपल्या शरीरावर दुष्परिणाम करतात . म्हणून दिवसाला कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करणे अनिवार्य आहे.

प्रश्न- कार्डियाक इव्हॅल्युएशन म्हणजे काय ?
डॉक्टर – भारत "डायबेटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड" आहेच .त्याचप्रमाणे हायपर टेन्शन आणि हार्ट डिसीज कॅपिटल बनण्याकडे वाटचाल करीत आहे. शुगर आणि बी. पी .या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने भारतातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असून या दोहोंमुळेच हार्ट डिसीजचे प्रमाण वाढते आहे. सोबतच वयानुसार हार्ट डिसीज वाढतात . तंबाखू , बीडी , सिगारेट ,आपले जेनेटिक्स , फमिली हिस्ट्री या गोष्टी हार्ट डिसीज होण्याला पूरक ठरतात.
तर अशा वेळेस आपण दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये कार्डियाक इव्हॅल्युएशन ऐकतो . हे काय आहे ? हे कोणी करावे ? कोणत्या रुग्णांना याची आवश्यकता आहे, ह्यामध्ये काय गोष्टी येतात ? हीसर्व माहिती असणे फार आवश्यक आहे.

प्रश्न - कार्डियाक इव्हॅल्युएशनची गरज कुणाला आहे ?
1 . छातीमध्ये तीव्र किंवा सौम्य वेदना होणे
२. श्वास भरून येणे
३. घाबरल्यासारखे वाटणे
4. चक्कर येणे
५. छाती भरल्यासारखी वाटणे
६. घाम येणे
७. धडधड होणे
८. जबडा , मान किंवा हातात दुखणे.
ह्या सर्व गोष्टी हृदय विकाराशी संबंधीत असू शकतात आणि अशा सर्व रुग्णांना कार्डियाक इव्हॅल्युएशनची गरज पडू शकते.

कार्डियाक इव्हॅल्युएशन काय आहे ?
इसीजी – हृदयाची लय बरोबर आहे की नाही, हृदयाच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे की नाही, हृदय विकारामुळे हृदयामध्ये काही बदल आहे की नाहीत आणि आणखी बरीचशी माहिती आपल्याला इसीजी वरून कळते. हृदयामध्ये रक्त वाहिन्याबरोबरच विद्युत वहनसुद्धा होते. याचा अर्थ असा की हृदय नीट धडधड करीत राहावे , यासाठीची यंत्रणा ! मिनिटाला ६० ते १०० च्या मध्ये ठोके असायला हवेत. जर हे ठोके जास्त किंवा कमी होत असतील तर त्रास होवू शकतो किंवा जीवाला धोका होवू शकतो. हे ठोके कमी किंवा जास्त होण्याची कारणे इसीजी वरून आपल्याला कळू शकतात . ठोके व्यवस्थित असले तरी त्याची लय जर ठीक नसेल तर तेही धोक्याचे असू शकते. हे सुद्धा इसीजीवरून लक्षात येते .हृदयाघात आहे की नाही किंवा छातीत दुखण्याचे दुसरे कोणते कारण आहे, याची माहिती इसीजी वरून कळते. हृदयाची रक्तवाहिनी पूर्णपणे बंद आहे की काही प्रमाणात बंद आहे, याचा अंदाज आपल्याला इसीजी वरून मिळू शकतो.
पूर्वी हृदयाघात झाला आहे का आणि हृदयाची काही जागा निकामी झाली आहे का, याचीही माहिती आपल्याला इसीजी वरून कळते. वाढत्या रक्तदाबामुळे हृदयावर अतिरिक्त ताण असल्यास, तेही इसीजी वरून समजते . इसीजी काढताना रुग्णाला झोपण्यासाठी सांगीतले जाते . त्या नंतर हात आणि पायाला इलेक्ट्रोडेज लावतात . तसेच छातीला सहा ठिकाणी ते लावून त्याचा ग्राफ आपण वाचतो. इसीजीची एक झेरॉक्स नेहमी काढून ठेवायला हवी . जुना इसीजी पुढल्या तपासणीसाठी फार उपयुक्त ठरू शकतो .

टू डी इको - टू डी इको ही एक टेस्ट आहे. ह्यामध्ये मशिनद्वारे आपल्याला हृदय दिसू शकते. ह्यासाठी रुग्णाला डाव्या कडावर झोपायला लावतात . छातीच्या भागावर जेल लावली जाते आणि त्यावर एक यंत्र ठेवले जाते .त्याद्वारे हृदयाला पहिले जाते.
हृदयाचे चार भाग असतात . दोन उजवीकडे आणि दोन डावीकडे. उजवीकडच्या भागातील रक्त शुद्ध होण्यास फुफुसात जाते. शुद्ध रक्त डावीकडे येते आणि नंतर पूर्ण शरीरात जाते.
या हृदयाच्या चार भागातील कोणत्या भागात त्रास आहे , हे इको कार्डीओग्राफी मध्ये आपल्याला कळू शकते.
हृदयाघातामुळे हृदयाची रक्तवाहिनी बंद होऊ शकते. हृदयाच्या तीन रक्त वाहिन्यांपैकी कोणत्या रक्तवाहिनीमुळे हृदयाला इजा होत आहे, ह्याचा अंदाज आपल्याला मिळू शकतो .
हृदयाघातामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हृदयाच्या भोवताली पाणी जमा झाल्यास याची माहिती आपल्याला इकोमुळे मिळू शकते.
हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी किती आहे, ती कमी झाली आहे का, हे इको कार्डीओग्राफीवरून कळते व त्यानुसार औषधोपचार देण्यास मदत होते. हृदयाच्या मांस पेशींची अतिरिक्त वाढ जीवाला धोकादायक ठरू शकते . याची माहिती तसेच हृदयाच्या चार भागांमधील झडपा व्यवस्थित काम करीत आहे की नाही, हे सुद्धा कळते .

टी .एम .टी. इसीजी आणि इको वरून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आहे की नाही ह्याचा अंदाज येत असेल पण शंभर टक्के खात्रीने हे सांगणे कठीण आहे की रक्तवाहिन्या व्यवस्थित काम करीत आहेत. याचा अर्थ ईसीजी आणि इको व्यवस्थित असतानासुद्धा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असू शकतो. यासाठी टी. एम. टी .या टेस्टची मदत घेतल्या जाते . यामध्ये रुग्णाला आपण चालायला लावतो. दर तीन मिनिटांनी चालण्याची गती आणि चढाव वाढवला जातो. ही चाचणी कोणत्याही वेळेस बंद करता येते. साधारणतः काही त्रास नसल्यास नऊ मिनिटे चालवले जाते आणि सोबतच ईसीजी काढला जातो. ईसीजी मध्ये काही बदल असेल तर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असू शकतो. मग अशा व्यक्तींना एंजिओग्राफी सांगितली जाते. काही व्यक्तींना होणारा त्रास पाहून टीएमटी न करतासुद्धा ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो .

ऍन्जिओग्राफी म्हणजे नेमकं काय ?
हृदयाला तीन रक्तवाहिन्या पुरवठा करतात. यात दोन डावीकडे तर एक उजवीकडे असते . या रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा म्हणजे ब्लॉकेज निर्माण झाल्यावर हृदयाचा रक्तपुरवठा बाधित होतो आणि व्यक्तीला हृदय रोग होतो. ऍन्जिओग्राफी प्रक्रियेद्वारे हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आणि त्यांच्या प्रमाणाचे निदान होते .ऍन्जिओग्राफी प्रक्रियेत मनगटातील किंवा मांडीतील रक्तवाहिन्यांमधून एक नळी प्रविष्ट केल्या जाते .या नळीद्वारे औषध देऊन हृदयाचा रक्तसंचार निर्धारित केल्या जातो. या औषधीला कुठेही अडथळा आल्यास ब्लॉकेजचे निदान होते . ही प्रक्रिया कॅथ लॅब मध्ये केल्या जाते .रक्तवाहिन्यांमध्ये प्रविष्ट केल्या जाणारी नळी ९० टक्के रुग्णांमध्ये मनगटातून तर उर्वरित १० टक्के रुग्णांमध्ये मांडीतून केल्या जाते. हृदय रोगातील महत्वाच्या दोन अवस्थेत ऍन्जिओग्राफीची गरज असते ,एक अंजायना आणि दुसरे हृदयाघात . अंजायना म्हणजे चालल्यानंतर छातीत दुखणे, घाबरल्यासारखे वाटणे ,घाम येणे इत्यादी .विश्रांती केल्यावर व्यक्तिला या लक्षणात सुधार जाणवतो . याउलट हृदयाघातात अर्ध्या तासापेक्षा जास्त आराम केल्यावरही छाती दाटलेली जाणवते आणि दुखण्याची तीव्रता अधिक असते. हृदयाघातात वेळ अतिशय महत्त्वाची असून रुग्णाला एका तासात उपचार मिळणे गरजेचे असते.ऍन्जिओग्राफी प्रक्रिया अमरावतीत नियमितपणे केल्या जाते .


एंजिओप्लास्टी आणि बायपास म्हणजे काय?

ऍन्जिओग्राफी द्वारे कोणत्याही धमनीमध्ये ७० टक्के ब्लॉकेज आणि मोठ्या धमन्यांमध्ये ५० ब्लॉकेजचे निदान झाल्यावर अशा रुग्णांमध्ये फक्त औषधांनी उपचार शक्य नाही .या अवस्थेत उपचार म्हणजे एंजिओप्लास्टी आणि बायपास ऑपरेशन. एंजिओप्लास्टीमध्ये बंद असलेल्या रक्त वाहिन्यांमध्ये तार टाकून एका बलूनद्वारे ही जागा मोठी करून अडथळा दूर केला जातो .रक्त पुरवठा अबाधित ठेवण्याकरिता त्या ठिकाणी धातूची एक ट्युब बसविली जाते .ही नळी औषध युक्त असते.
दुसरी पद्धत म्हणजे बायपास सर्जरी .यात बंद रक्तवाहिनी समोर दुसरी रक्तवाहिनी जोडल्या जाते .यामुळे रक्त पुरवठा पूर्ववत सुरू होतो. याशिवाय तिसरा कुठलाही उपचार नाही .
एंजिओप्लास्टी प्रक्रिया अमरावतीत नियमित केल्या जाते आणि ही पद्धती सुरक्षित ठरली आहे .एक लक्षात असू द्या ,हृदयाघात झाल्यावर एक एक मिनिट मोलाचा असतो आणि रुग्णावर त्वरित एंजिओप्लास्टी होणे गरजेचे असते. एंजिओप्लास्टी झाल्यावर नियमित तपासणी आणि औषधोपचार देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

हृदयाघात झाल्यानंतर लगेच काय करावे ?
कोणत्याही व्यक्तीत छातीत दुखणे, उलटी, मळमळ, चक्कर येणे, छातीत जड वाटणे, दम लागणे, घाम येणे, कोरडा खोकला इत्यादी जाणवल्यास ही लक्षणे हृदयाघाताची असू शकतात. अशा वेळेस कुणालातरी मदतीसाठी त्वरित बोलावून ॲम्बुलन्स आणावी. सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवावी. म्हणजे रुग्णाला तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ असल्यास सीपीआर म्हणजे कार्डीओरेस्पीरेटरी रीस्टीटेशनमध्ये प्रशिक्षित व्यक्तींनी त्याला कृत्रिम श्‍वासोच्छ्वास व बाहेरून हृदयाला कृत्रिम दाब म्हणजे कार्ड मसाज द्यावी. वेळेवर व अचूक पद्धतीने दिलेली ही प्रक्रिया जीवनदान देणारी ठरू शकते. हार्ट अटॅक सोबतच कार्डियाक अरेस्ट हा अतिशय घातक प्रकार आहे. कारण या रुग्णाला त्वरित उपचार न मिळाल्यास तो जागेवरच कोसळू शकतो.

 

डॉ. अक्षय ढोरे
MBBS MD (Internal Medicine)
DM (Cardiology)