मधुमेह आणि किडनी-चोरपावले ओळखा !

मधुमेह आणि किडनी-चोरपावले ओळखा !

 

मधूमेह आपल्याला नवा राहिलेला नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर रक्तातील ग्लुकोज वाढलेले असणे, म्हणजे मधूमेह. वास्तविक ग्लुकोज च्या रूपातच संपूर्ण शरीराला रक्तप्रवाहातून ऊर्जा मिळते. पेशींना ग्लुकोज रक्तप्रवाहातून घेऊन वापरता यावे यासाठी इन्सुलिन आवश्यक असते. स्वादुपिंडातून पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार न होणे किंवा इन्सुलिनचा परिणामकारक वापर न होणे या मुळे ग्लुकोज रक्तप्रवाहात जास्त काळ राहू लागते. आवश्यकतेपेक्षा अधिक ग्लुकोज असे सतत विविध अवयव व पेशींच्या संपर्कात राहिल्याने, त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ लागतो. शरीरातील अनेक अवयवांचा घात होतो तो यामुळे, आणि रक्तशर्करेचे नियंत्रण आवश्यक आहे ते देखील यासाठीच.

भारतातील मधुमेहाची समस्या
२०१५-२०१९ या दरम्यान केलेल्या पाहणीचे निष्कर्ष भारत सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयाकडून २०१९ मध्ये प्रकाशित केले गेले. त्यामध्ये असे आढळून आले की लोकसंख्येच्या ८% एवढा मधुमेहाचा प्रादुर्भाव आहे आणि ७०-७९ या वयोगटात तो सर्वाधिक १३.२% एवढा आहे.

मधुमेह आणि किडनी (मूत्रपिंड )
जवळजवळ २५-३०% रुग्णांच्या बाबतीत जेव्हा मधुमेहाचे निदान होते तेव्हा शरीरातील एक/अनेक अवयवांवर दुष्परिणाम होण्यास सुरुवात झालेली असते. हे दुष्परिणाम अचानक होत नाहीत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात येत नाहीत. सहसा रुग्णांना त्याचा त्रास जाणवत नाही. किडनीचे देखील असेच आहे.
किडनीचे काम हे रक्ताचे फिल्ट्रेशन करण्याचे असते. किडनीमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते, या रक्तवाहिन्या आणि किडनीच्या ' ग्लोमेरुलस व ट्युब्युल हे सर्व मिळून रक्तातील नको असणारे पदार्थ काढून टाकणे व आवश्यक त्या गोष्टी पुन्हा रक्तप्रवाहात आणण्याचे काम करतात. मधुमेहामुळे, इतर अवयवांप्रमाणे किडनीच्या देखील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. शरीरातील नको असणारे व घातक पदार्थ रक्तामध्ये साठू लागतात. प्रोटीन लघवीतून बाहेर टाकले जाऊ लागते ( सामान्यपणे लघवीत प्रोटीन नसते ) .
शरीरातील अत्यंत महत्वाचे असे हे 'फिल्टर ' खराब होऊ लागते! या सर्वांसोबत जर उच्च रक्तदाब असेल तर अजून मोठ्या प्रमाणावर व अजून वेगाने हे दुष्परिणाम होतात. मधुमेहाचा परिणाम नसांवर सुद्धा होतो. मूत्राशय अर्थात ' युरिनरी ब्लॅडर ' च्या नसांना जर हानी झाली तर त्याचा परिणाम मूत्राशयाच्या कार्यावर होतो. योग्य वेळी, योग्य दाबाने पूर्ण लघवी बाहेर न टाकता आल्याने संसर्गाचा धोका वाढतो. अनियंत्रित ग्लुकोज बरोबर येणारे संसर्ग लवकर औषधांना दाद देत नाहीत. मूत्राशयाचे उलटे प्रेशर कधी कधी किडनीवर देखील परिणाम करते. अशा रीतीने किडनी व संपूर्ण उत्सर्जन प्रक्रिया एका दुष्टचक्रात सापडते!!

या सर्वांची लक्षणे कोणती ?
दुर्दैवाने आपल्या शरीराची कार्यपद्धती अशी आहे कि खूप किंवा अपरिवर्तनीय नुकसान होईपर्यंत कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. काही धोक्याची लक्षणे मात्र सांगता येतील
१. दम लागणे , श्वास घेण्यास त्रास होणे
२. पावले व घोट्यांवर सूज येणे
३. भूक न लागणे
४. सतत थकवा जाणवणे
५. वारंवार डोके दुखणे
६. पोट बिघडणे
७. मळमळ
८. उलट्या
९. झोप न येणे
१०. एकाग्रता कमी होणे

किडनीच्या आजाराचा धोका वाढवणारे घटक कोणते ?
किडनीच्या आजाराचे लवकर निदान होणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. मधुमेह म्हणजे अगदी pre डायबेटिस देखील असेल तरी आपल्या किडनीवर अतिरिक्त ताण आहे हे ओळखावे. त्यामुळे कमीतकमी वर्षातून एकदा त्यासाठी तपासण्या कराव्या. मधुमेहाबरोबर जर खालीलपैकी कोणतेही घटक आपल्याला लागू असतील तर आपण जास्त काळजी घेणे आवश्यक ठरते.
१. अनियंत्रित उच्च रक्तदाब
२. स्थूलपणा
३. वाढलेले कोलेस्टेरॉल
४. कुटुंबामध्ये किडनी किंवा हृदयविकाराची अनुवंशिकता
५. धूम्रपान
६. वय - मधुमेह किती काळापासून आहे.

डायबेटिक नेफ्रोपॅथी अर्थात मधुमेहाचे किडनीवरील परिणाम टाळण्याचे मार्ग

१. योग्य आहार - आपण काय खातो आहो यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल हे दोन्ही नियंत्रित राखता येईल असा आहार ठरवून घेतला पाहिजे.
२. रक्तदाब - रक्तदाब १३०/८० च्या खाली असावा. किडनीचा अगदी सौम्य आजार जरी असेल स्त्री उच्च रक्तदाब त्यासाठी घातक ठरू शकतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील गोष्टी करता येतात
मिठाचे प्रमाण कमी करणे - जेवणात वरून मीठ न घेणे
वजन कमी करणे
दारू टाळणे
नियमितपणे व्यायाम करणे
३. औषधोपचार- रक्तदाबासाठी उपयोगी येणाऱ्या काही औषधांचा किडनीवर ' प्रोटेक्टिव्ह ' अर्थात चांगला परिणाम होतो. हि औषधे मधुमेही रुग्णांना दिली जातात.
४. धूम्रपान बंद करणे- किडनीच्या आजारावर धूम्रपानाचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. ते पूर्णपणे बंद करणे चांगले.
५. मधुमेहाचे नियंत्रण- आपली औषधे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित घेणे महत्वाचे. त्याचप्रमाणे स्वतः ग्लुकोमीटरने आपली रक्तशर्करा तपासत राहणे देखील उपयोगी ठरते. याला ' सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोज - SMBG म्हणतात. उपाशीपोटी हे प्रमाण ८०-११० मिग्रॅ असावे, तर जेवणानंतर दोन तासांनी १८० मिग्रॅ पेक्षा कमी असावे. याशिवाय HbA1C ही मागील तीन महिन्यांच्या साखरेचे प्रमाण दर्शवणारी टेस्ट देखील नियमितपणे करावी.

किडनीच्या आजाराचे निदान करण्यासाठी टेस्ट
आपण किडनीचा आजार लवकर ओळखला पाहिजे हे बघितले. तसे केल्याने, योग्य ती खबरदारी घेऊन पुढील धोका व किडनीच्या ऱ्हासाची गती कमी करता येते. त्यासाठी पुढील दोन टेस्टचा नियमित वापर करतात
१. लघवीतील प्रोटीन किंवा युरीन मायक्रोअल्ब्युमीन - लघवीमधून प्रोटीन बाहेर टाकल्या जाणे हे किडनीच्या आजाराचे लक्षण आहे हे आपण जाणतो. याचे प्रमाण अगदी कमी असताना व अल्ब्युमिन हे महत्वाचे व आकाराने लहान प्रोटीन लघवीमध्ये येऊ लागताच या टेस्टद्वारे ते ओळखता येते. या टेस्टमध्ये लक्षणीय अल्ब्युमिन आढळले तर किडनी तज्ञ म्हणजे नेफ्रोलॉजिस्ट चा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
२. GFR - हे किडनीच्या कार्यक्षमतेचे मापक आहे व त्याचे सिरम creatinine , वय, लिंग, वंश या सर्वांवरून अनुमान लावतात. त्यावरून किडनीच्या आजाराचे प्रमाण व उपचार ठरवले जातात.

थोडक्यात महत्वाचे असे की, मधुमेहाचे किडनी, हृदय व इतर अनेक अवयवांवर दुष्परिणाम होतात आणि त्यांची लक्षणे उशिरा समोर येतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी मधुमेहावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे व फायदेशीर आहे. त्यासाठी ABCDE चे सूत्र नक्की लक्षात ठेवा :-
A - HbA1C
B - Blood pressure control
C - Cholesterol levels in control
D - Appropriate Diet
E - Exercise

 

-डॉ. प्रकाश गुडसूरकर