साईचं दुकान

साईचं दुकान

जुन्या पुराण्या वस्तू ठेवलेल्या अडगळीच्या खोलीत जसा एखादा लाकडी पेटारा असतो ना तसं या आठवणींच असतं. आठवणींच्या कप्प्यात एक छोटीशी कुपी दडलेली असते. कधी तरी पसारा आवरताना नकोशी म्हणून टाकून दिलेली ती छोटी कूपी नकळत उघडतो आणि जुन्या आठवणीचा दरवळ पसरतो…..

आमचं कुटुंब गेली १२० वर्ष ज्या परिसरात वास्तव्य करत आहे तो म्हणजे नमुना! हो नावच नमुना….. पेठांची नावं कशी भारदस्त असतात, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, नारायण पेठ इत्यादी. किंवा ब्रिटिश काळातील अधिकाऱ्यांच्या नावाची वगैरे ….. लमिंग्टन रोड, एम जी रोड (अर्थात महात्मा गांधी) कनॉट प्लेस इत्यादी. अन् आमचं काय तर…...नमुना! असो त्याला काही इलाज नाही. आता इतकी वर्ष इथे नमुन्यात काढली असल्याने नावाचे काही वाटत नाही. हा, लोकांना मात्र अप्रूप वाटतं. तर अशा या नमुन्यात अख्या ५ पाच गल्ल्यातील शे दोनशे घरकुलांची नित्याची गरज भागविण्यासाठी एक प्रसिद्ध व्यवस्था होती.

अर्थात ती प्रसिद्धी नमुन्या पुरतीच मर्यादित. आजच्या पिढीला तर ठावूक असणे शक्यच नाही. साईचं दुकान ते. आत्ता अचानक साईचं दुकान आठवण्याचे काय कारण….. तसं साई नावाच्या त्या दुकानदाराने असं काही जगावेगळं कर्तृत्व वगैरे नक्कीच गाजवले नव्हते. लहानपणापासून मला त्या दुकानदाराचे नाव ' साई ' असेच कानावर पडल्याने कधी मनात प्रश्न आलाच नाही की त्याचे नाव अमुलमल ताराचंद बजाज असे भारदस्त असू शकते. म्हणजे अगदी बजाज स्कूटर्सच्या कंपनी मालकाला लाजवेल इतके वजनदार ! तर या साईने आमच्या नमुन्यातील किमान तीन पिढ्या लाहानाच्या मोठया झालेल्या पाहिल्या आहेत. मी मात्र लहानपणापासून साईला तसेच बघत आलोय…. सडसडीत बांधा, डोक्यावर तुरळक पांढरे केस, चेहरा सुरकुतलेला, तोंडातील काही दातांनी निरोप घेतलेला; तर शिल्लक दातांनी पानांच्या रंगाने होळी खेळलेली ! अशा व्यक्तिमत्त्वाला काय कोणाच्या आयुष्यावर छाप पाडण्या इतपत तरी वलय असणार का?

पण असे सामान्य व्यक्तीचं दैनंदिन आयुष्यच माणसाला खूप काही शिकवून जाते. साई म्हणजे तसा सिंधी समाजातील बंधू. फाळणीच्या काळात पाकिस्तानातून जे विस्थापित कुटुंब भारतातील विविध क्षेत्रात स्थायिक झाले तसे अमरावतीत सुद्धा वेगवेगळ्या भागात सिंधी कॅम्प अशा वस्त्यांमध्ये सिंधी बांधव स्थिरावले. सिंधी समाजाची वणिक वृत्ती त्यांना व्यापाराच्या क्षेत्रात पुढे येण्यात सहाय्यभूत ठरली. काटकसरीने जगण्याची सवय अंगवळणी पडलेली, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि ग्राहकाला रिझवून बरोबर माल खपविण्याची हातोटी या गुणांमुळे कित्येक वर्ष साईचे दुकान आहे तसेच टिकले. आमचा साई सगळ्या नमुन्यात हक्काचा दुकानदार झाला. माझी आजी सांगायची अगदी सुरुवातीला जेव्हा ते दुकान साइने लावले तेव्हा तो भल्या पहाटे यायचा तिथेच एक बादली पाण्याने अंघोळ. अंगावर पाणी घेताना गोल फिरायचे म्हणजे त्याच पाण्याचा सडा दुकानासमोरील जागेत पडायचा. एका कामात दोन्ही उद्देश साध्य. साईला नेहमी मी सायकल वरच फिरताना पाहिले आहे. दुकानात लागणारे सामान तो त्याच्या सायकल वर मागे पुढे गठ्ठे बांधून घेऊन यायचा. दिवसभर दुकान सुरू असायचे. बरेच दुकानदार दुपारी बारा ते चार दुकान बंद ठेवतात. पण आमचा साई तिथे दुकानातच खाली पथारी अंथरून वामकुक्षी घ्यायचा. गिऱ्हाईक आला की लगेच स्वारी उठून तयार !

किराणा सामान, गोळ्या, बिस्किटे, सौंदर्य प्रसाधने, आणि अशा कितीतरी दैनंदिन वापराच्या वस्तू विकायला असल्याने दिवसभर साईच्या दुकानात सतत वर्दळ असायची. लहान मुले ' ओ साई ' अशी आरोळी मारून आपली फर्माईश करायचे….. दो चुरण की गोली दो ना असे वाक्य तर प्रत्येक मुलाच्या मुखी असायचे. या चुरणाच्या गोळ्यांनी तर आमच्या पिढीला अशी काही भुरळ घातली होती की आजच्या कॅडबरीची काय मिजास. त्यातही मला ते केळकरचे बोरकुट जीवापाड प्रिय. लपून छपून बोरकुट कसे खायचे याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या आम्ही लहानगे योजायचो. त्या बोरकुटा पायी मला इतका प्रचंड खोकला झाला होता की घरचे सर्वजण चिंतातुर झाले होते. खोकल्याची उबळ येऊन जीव कासावीस व्हायचा, क्षयरोग (T.B.) च्या तपासण्या झाल्या पण सुदैवाने तसे काही निघाले नाही. आमच्या मातोश्री नी त्या बिचाऱ्या साई ची कानउघाडणी केली, आमच्या पोरांना बोरकुट विकल्यास याद राख !

त्या साई च्या दुकानात उधारी वर वस्तू, समान, किराणा मिळत असे. तो प्रत्येकाच्या नावे त्याच्या वहीत उधारी मांडून ठेवत असे. आमच्या कुटुंबाचे पण असेच खाते साई कडे होते. मी तसा लहानपणापासूनच हुशार, व्यवहार चतुर वगैरे ! मला त्या उधारी खात्याबद्दल कळले. नेहमी आजी, आई आणि घरातील मोठी मंडळी सामान आणायला साईच्या दुकानात मलाच पिटाळायचे. त्यामुळे ' ओ साई…..खाते मे लिख देना ' हे परवलीचे शब्द मला ठाऊक झाले होते. फरक एवढाच की माझ्या बाल मनाचा असा समज झाला की साईच्या दुकानातून आपल्याला फुकटात सामान मिळते. पैसे देणे वगैरे भानगड काय असते याचा संबंधच नाही. मग काय बोरकुट, चॉकलेट, गोळ्या बिस्किटे यांचा रतीब सुरु राहायचा. पण लवकरच आमच्या चाणाक्ष मातोश्रींच्या ध्यानात एक गोष्ट आली की महिन्याला अनावश्यक खर्च ' खात्यात ' कुठून होतोय. झाले पुन्हा बिचाऱ्या साईची खरडपट्टी. हमारे बच्चे को चोकलेट गोली फुकट मे भी दिया तो याद रखना ! मला आता असे वाटते की तो बिचारा साई नमुन्यातील अशा कित्येक आयांच्या बोलणी खाण्याचा धनी झाला असेल.

आणखी एक गंमत….. साईचे दुकान नमुना चौकात अगदी आमच्या घराच्या परसदाराच्या समोरच होते….हाकेच्या अंतरावर. त्यामुळे दुकानातील सर्व हालचाली घरच्या ओसरीवरून दिसायच्या. घरच्या मोठ्यांनी सांगितले की सामान आणायला पळायचे. आमचे बाबा आठवण सांगतात की तेवढे अंतर देखील चालून जायचे असेल तरी ते त्यांच्या लहानपणी आधी कपडे बदलायचे, केस नीट करून जरा नीटनेटके होऊन मगच दुकानात जायचे….. का तर तिथे बरेच मुलं मुली असतात. असेच घरातल्या चड्डी बन्यान वर जायची लाज वाटायची! तेच गुण अस्मादिकात सुद्धा होतेच.

वर्षानुवर्षे साई त्याचे दुकान इमाने इतबारे चालवत होता. आमचे काका आणि चुलत भाऊ वगैरे आले की तो आवर्जून घरी भेटायला यायचा. आणि आमचे काका, चुलते देखील जुन्या सवांगड्याला आठवणीने भेटायचे. कित्येक उन्हाळे पावसाळे बघितलेला साई आणि त्याचे दुकान तीन पिढ्यांच्या परिवर्तनाचा साक्षीदार होता. पुढे मोठे झाल्यावर समजले की त्याचे दुकान स्वतःचे नसून मशिदितील एका भाड्याच्या जागेत होते. दुकान सोडण्यासाठी साई ला अनेकदा लोकांनी प्रलोभने दिली, धमकावून पाहिले पण हा पठ्ठ्या काही जागा सोडेना. एकदा तर चक्क त्याच्या दुकानात ट्रकच घुसला. वरकरणी तो अपघात वाटत होता पण कानोकानी हीच खबर की साईला दुकान सोडण्यास भाग पाडण्याचे ते एक कारस्थान होते. एवढे होऊन देखील आमचा साई ढिम्म हलेना. त्याच्या चिवट पणाला सलाम. पुढे त्याची मुलं मोठी झाली, कमावती झाली. मुलांच्या लग्नाची निमंत्रण द्यायला साई आवर्जून आला. आमचे बाबा देखील त्यांच्या कडील लग्नाला जाऊन आले. आत्ता काही वर्षांपूर्वी साई ने आग्रहपूर्वक त्याच्या राहत्या घरी नातीच्या बारशासाठी बोलाविले. रामपुरी कँपच्या अरुंद बोळ्यांमधून शोधत आम्ही साईच्या दुमजली घरासमोर पोचलो तेव्हा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. इतकी वर्ष ज्या साईला आम्ही कळकटल्या मळकटल्या कपड्यात बघत आलो तो अशा छानशा दुमजली घरात राहत असेल यावर आम्हा सगळ्यांचा विश्वास बसेना. दोन्ही मुले, सूना, नातवंडं, जावई, मुलगी तिची नात अशा सगळा गोतावळयात साई आणि त्याची सौ आनंदाने राहताना पाहून खरंच मनापासून आनंद वाटला. मुले देखील दुसऱ्या ठिकाणी दोन किराणा दुकान चालवतात. एलआयसी एजंट म्हणून काम पण करतात. एकंदरीत सुखवस्तू असे मध्यमवर्गीय कुटुंब ते. मुलं माझ्या बाबां जवळ साईची तक्रार करत होते…. अंकल जी आप पिताजी को समझाइयेना। उम्र हो गई है, हम लड़के सब कारोबार संभाल लेते है। उनको दुकान में जाने की क्या जरूरत है?
बाबांच्या डोळ्यातही टचकन पाणी आले, एवढी माया कमावली साईने….. म्हातारपणी आणखी काय हवे असते! त्यांच्या परीने बाबांनी साईला समजवले पण साईच तो….. सायकल पर घूमना हो जाता है, समय भी कट जाता है। जबतक खुदसे ये सब मुमकिन है तबतक करेंगे।

अखेर कोर्ट कचेरीच्या मामल्यात मशिदीच्या परिसरात असलेल्या सर्व भाडेकरू दुकानदारांचा टिकाव लागला नाही. हेरिटेज दर्जा पेक्षा कमी नसेल असे ते साईचे दुकान अलगद काळाच्या पडद्याआड गेले. बुलडोझर ने उडवलेल्या धुराळ्यात आणि आजूबाजूच्या बघ्यांच्या गर्दीत साईच्या डोळ्यातून घरंगळणारे अश्रू खरंच कुणाला दिसले असतील का?

 

डॉ. यशोधन बोधनकर