संपादकीय

संपादकीय

निरामयच्या सर्व वाचकांना शुभकृत संवत्सराच्या आरंभी अनेक अनेक शुभेच्छा!! मागील नऊ महिन्यांत आपल्या भेटीत खंड पडला. गुढी पाडवा, परमपूज्य आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा नवीन अंक वाचकांच्या हाती देत आहो याचे मात्र समाधान आहे. गेल्या २ वर्षात जग कुठल्याकुठे बदलले! महामारीचे भय, कोणा आप्तस्वकियांचे मृत्यू, आर्थिक अडचणी यातून मार्ग काढत काढत, स्वतः लसनिर्मिती करून तब्बल १७५ कोटी डोस देण्यापर्यंत, इतर अनेक देशांना देखील ती पुरवण्यापर्यंत आपण मजल मारली! विषयाचा आवाका खूप मोठा आहे, एवढे मात्र खरे की तुम्ही-आम्ही, आपण सर्वजण एका मोठ्या स्थित्यंतराचे साक्षीदार आहोत! महामारीच्या मिट्ट काळोखानंतर येऊ घातलेला उज्वल उषःकाल आपण पहात आहोत!!

'अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा' या विजिगिषु वृत्तीचे दर्शन घडवणारे अनेक प्रगतीचे टप्पे आपल्या हॉस्पिटलने या मधल्या काळात पार केले आहेत. अतिदक्षता विभागाची सोय आपल्याकडे पूर्वी नव्हती, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यापासून डॉ. हेडगेवार हॉस्पिटल- भाराणी क्रिटिकल केयर युनिट सुरु करून आपण ती उणीव भरून काढली आहे. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल मध्ये ENT, मनोरोग व icu मध्ये हृदयरोग, मेंदूरोग-नयूरॉलॉजि, मेंदू व मणक्यांची शल्यक्रिया - न्यूरोसर्जरी, पोटविकारतज्ञ - गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, मूत्रमार्गाचा शल्यक्रिया - युरॉलॉजी या सर्व सेवा सुरु केल्या आहेत. या वाढत्या व्यापामध्ये उत्तम प्रतीची सेवा, योग्य तेवढेच शुल्क व आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना शक्य तेवढे साहाय्य या मूळ संकल्पाला धरूनच काम सुरु आहे.

या सोबत आपला फिरता दवाखाना आता संत गाडगेबाबा सेवावस्ती प्रकल्पांतर्गत शहरातील ४ सेवावस्तींना साप्ताहिक सेवा देत आहे. उरलेल्या दोन दिवसात हा फिरता दवाखाना पिंपळखुटा व नांदुरा या ग्रामीण भागात सेवा देतो. टिमटाला येथील संवेदना आरोग्य केंद्राची सेवा आता ११ गावांपर्यंत पोचते आहे व समाजातून मिळणार प्रतिसाद असा आहे की आता गावकऱ्यांतूनच आरोग्यसेविका तयार होत आहेत. त्यांना हॉस्पिटलकडून प्रशिक्षण दिले जात आहे. कोविडच्या काळात आपण रुग्णांना अत्यंत माफक दरात होम मॉनिटरिंग उपलब्ध करून दिलेच, शिवाय कमी दरात रक्ताच्या तपासण्या सुद्धा केल्या. याच काळात आजारपणामुळे पलंगाला खिळलेल्या रुग्णांसाठी हॉस्पिटलने अक्षयवट हा प्रकल्प सुद्धा सुरु केला. रुग्णांना घरी जाऊन तपासणे व तिथेच करण्यासारखे उपचार, ड्रेसिंग या गोष्टी करणे ही आजच्या घडीला समाजातली मोठी गरज ओळखून ही सोय प्रथमच आपल्या हॉस्पिटलने करून दिली आहे.

निरामयच्या या अंकात आरोग्य व आरोग्यसमस्या याबद्दलचे लेख आहेतच, शिवाय आपल्या या प्रवासाची काही झलक आहे. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे हे दशकपूर्ती वर्ष आहे. हा हॉस्पिटलच्याच नाही तर संपूर्ण समाजाच्या अभिमानाचा विषय आहे की आजच्या काळात असे सेवाभावी कार्य पाय रोवून उभे राहते, विस्तारते व समाजाच्या विश्वासास पात्र होते!! दशकपूर्ती संबंधी अजून, पुढील अंकात.! सर्वांना नूतन वर्षाभिनंदन व निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा!!

 

डॉ. मानसी कन्नडकर कविमंडन