जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लाखोंच्या संख्येत लोक हृदयासंबंधी गंभीर आजाराचा सामना करताना दिसतात. हृदय विकारासंबंधीत जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये वर्ल्ड हार्ट डे म्हणून - जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा करतात. या निमित्त्ताने प्रख्यात फिजिशियन डॉ. गणेश बनसोड यांच्याशी परीहृद धमणी(Coronary artery) विषयी केलेली चर्चा......
जागतिक हृदय दिवसानिमित्त साजर्या होणार्या उपक्रमामध्ये “हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणार्या परिणामांचा” समावेश होतो. जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अधिकतर व्यक्ती हृदयरोहिणी किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. भारतात दरवर्षी होणार्या मृत्यूंपैकी तब्बल ३२ % मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. विशी-तिशीच्या उमद्या तरुणाचेही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदा.आहेत. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी, ही माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
हृदय -आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असून शरीराला प्राणवायू आणि पोषक घटकांसह रक्तपुरवठा करण्याचे महत्वपूर्ण कार्य ते करीत असते आपले हृदय प्रत्येक सेकंदाला कार्यरत असते . हृदयामध्ये चार कप्पे असतात. ज्यामध्ये दोन कप्पे वरच्या बाजूला तर दोन खालच्या बाजूला असतात. वरच्या बाजूच्या कप्प्यांना “राईट आणि लेफ्ट आर्टरीया”(atria)असे म्हणतात. तर खालील दोन बाजूला असलेल्या कप्प्यांना “राईट आणि लेफ्ट वेंट्रीकल” असे म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना परीहृद धमणी(Coronary artery) द्वारे रक्त पुरवठा होतो.
माणसाची शरीररचना सारखीच असली तरी हृदयविकार होण्याची कारणे मात्र वेगवेगळी असू शकतात , हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे . त्यामध्ये हृदयात जन्मजात असलेले दोष (Congenital Heart Disease)कार्डीओमायोपॅथी म्हणून संबोधल्या जाणार्या कारणांमध्ये उच्च रक्तदाब, संसर्ग, कर्करोग, स्वयंप्रतिकारक रोग (Auto immune)कार्डीओमायोपॅथी, हृदयविकाराचा झटका, आघात आणि अरिथेमिया- हृदयांच्या झडपांच्या विकारांचा समावेश आहे.
आज आपण हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या परीहृद धमणी(Coronary artery) विषयी होणाऱ्या आजाराबाबत सविस्तर चर्चा करूया.
Coronary artery Disease –कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे काय?
हृदयविकारांचा विचार करता, जगात कोरोनरी आर्टरी डिसीजचं प्रमाण लक्षणीय आहे. या विकारात हृदयाला होणार्या रक्त पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं दिसून येतं. हृदयविकाराच्या या प्रकारात धमणी काठीण्य दिसून येतं. रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या धमनी अरुंद किंवा ब्लॉक होतात तेव्हा त्याला “कोरोनरी आर्टरी डिसीज “ म्हणतात. हा हृदयविकारांचा सर्वसामान्य प्रकार मानला जातो. हा प्रकार हृदयविकारांचा झटका (Coronary artery Disease )येण्यासाठी कारणीभूत ठरतो.
कार्डियाक अरेस्ट
रक्तप्रवाह खंडित झाल्यानं ,रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. या रोगामध्ये कोरोनरी धमनीच्या आत कॉलेस्टेरॉल, कॅल्शियम इत्यादी जमा होऊन ब्लॉकेज विकसित होतात. या स्थितीला अथेरोस्केलेसिम म्हणतात .अथेरोस्केलोसिटीअक मुळे धमणी अरुंद बनतात आणि Myocardial infarction ची शक्यता त्यामुळे चार पटीने वाढते.
हा आजार कुठल्या वयोगटात दिसून येतो?
साधारणतः हा आजार वयाच्या पन्नाशीनंतर जास्त प्रमाणात आढळून येतो पण अलीकडची आपली जीवनशैली पाहता हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय सांगता येत नाही! तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढतेच आहे. विशी आणि तिशीच्या तरुणांना हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराचा धोका हा वयोमानपरत्वे वाढत असला तरी त्याची लागण अनुवंशिकता आणि पर्यावरणातील घटकांवर अवलंबून असते. हृदयविकाराचे प्रमाण व त्यामुळे होणारा मृत्यू हा पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळून येतो .
· हृदयविकारांसाठीचे जोखीम वाढवणारे घटक-Risk factors कोणते आहेत?
साधारणतः रिस्क फॅक्टर दोन प्रकारचे असतात.
१. नियंत्रणात नसलेले रिस्क फॅक्टर, ज्यांना वैद्यकीय भाषेत “ Non Modifiable Risk factor” म्हणतात. साधारण 55 व्या वर्षानंतर होणारा धोका हे मुख्य कारण आहे. अनुवंशिकता लिंग जसे की पुरुषांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण जास्त असते तर हृदयविकारांमुळे अधिकाधिक मृत्यूचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. एकंदरीत जगाच्या तुलनेने भारत देशात रिस्क फॅक्टर या कारणांमुळे भारतीयात हृदयविकारांचे प्रमाण हे जास्त आहे.
२. नियंत्रित करण्यासारखी कारणे ज्याला आपण मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर म्हणतो. यामध्ये मुख्य कारण म्हणजे मधुमेह, उच्चरक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण, धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, वर्जित पदार्थांचे सेवन, ड्रग्स किंवा जंक फूडचे अधिक सेवन, फॅटयुक्त पदार्थांचा आहारात जास्त समावेश असणे तसेच फायबरयुक्त अन्न आणि फळांचा जेवणात अभाव ही मुख्य कारणे असतात. आजकालच्या जीवनशैलीमध्ये तणाव, मानसिक ताण हा वाढलेला आहे. तणावाला हृदयाचा शत्रू मानला जाते . त्यामुळे अनेकदा हृदयच्या आजारांचा थेट संबंध वाढत्या तणावाशी जोडून पाहिला जातो. निद्रानाश किंवा शांत झोपेचा अभाव असेल तर शरीरात स्ट्रेसहार्मोन वाढले जातात, याचा थेट परिणाम हृदयावर होऊन हृदयविकार वाढण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.
हृदयविकाराची लक्षणे काय असतात?
हृदयविकारांची लक्षणे प्राथमिक अवस्थेमध्ये स्पष्टपणे दिसून येत नाहीत. जसजसे ऑथेरोस्कोरोसिसचे प्रमाण वाढते, तसे खालील प्रमाणे सामान्य लक्षणे दिसून येतात.
- छातीत वेदना होणे,
- छातीत जडपणा वाटणे,
- पोट आणि पाठीच्या वरच्या भागांमध्ये जडपणा वाटणे,
- धाप लागणे, थकवा जाणविणे,
- जास्त प्रमाणात घाम येणे,
- छातीत धडधडणे,
- क्वचित प्रसंगी डाव्या हातामध्ये दुखणे,
- गळा आणि जबड्यामध्ये दुखणे,
- पायाला सूज येणे,
वरील प्रमाणे लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे.
हृदयविकाराचे निदान कसे करतात?
हृदयविकार आहे की नाही ,या निदानाकरिता डॉक्टर वैद्यकीय इतिहास (Medical History) ,रक्तदाब आणि हृदयाचे ठोके मोजतात. प्राथमिक निदानाकरिता हृदयाचा आलेख -ईसीजी काढणे अत्यंत आवश्यक असते. इसीजीची तपासणी नॉर्मल असल्यास, हृदयविकाराचा डॉक्टरांना दाट शक्यता वाटल्यास मात्र एक्सरसाइज स्ट्रेस टेस्ट करणे गरजेचे असते.
गरज भासल्यास इको इको-कार्डिओग्राफी, कार्डियाक सिटी किंवा कार्डिएक एन्जिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे हृदयाच्या प्रतिमा आणि हृदयामध्ये नेमकं काय सुरू आहे हे कळू शकते. तसेच वरील चर्चा केल्याप्रमाणे जे जोखीम वाढवणारे घटक असतात ते ओळखण्यासाठी रक्ताच्या तपासण्या जसे की - रक्तातील साखरेची पातळी, रक्तातील चरबीचे प्रमाण, इत्यादी तपासणी करणे योग्य ठरते.
यासाठी उपचार पद्धती काय सुचवाल ?
एकदा हृदयविकाराचे निदान झाल्यास कोरोनारी अँजिओग्राफी करणे गरजेचे असते. यामध्ये आपल्याला हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे- म्हणजेच ब्लॉकेजचे प्रमाण कळून येते . त्यामुळे पुढील उपचार करणे सोयीचं ठरतं. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे हे ७०% ते ८० % च्या वर आढळल्यास डॉक्टर आपल्याला एन्जोप्लास्टी करण्याचा सल्ला देतात. यामध्ये उपचार म्हणून मेडिकेटेड स्टेनट वापरून अडथळ्याला दूर करून रक्तपुरवठा पूर्ववत केला जातो, हृदयाला रक्तपुरवठा करणार्या धमन्यांमध्ये जास्त प्रमाणात अडथळे असल्यास त्याला “ट्रिपल व्हेसेल डिसीज” असे म्हणतात. त्यावेळेस डॉक्टर आपल्याला “कोरोनरी आर्टरी” बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.
असे अडथळे ७० टक्क्यांच्या कमी असल्यास रक्त पातळ करण्याची गोळी, ओषधे आणि जोखीम वाढवणारे घटक (Risk factor )हे व्यवस्थित नियंत्रणात आणण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
हृदयविकार टाळण्याकरिता घ्यावयाची काळजी काय घ्यावी ?
वर सांगितल्याप्रमाणे जोखीम वाढवणारे घटक नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते.
· आपल्याला उच्च रक्तदाब असेल तर आपले रक्तदाब नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते, त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम करून वजन आटोक्यात ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आणि नियमित औषधे घेणे महत्त्वाचे असते.
· मधुमेह असलेल्यांनी आपले रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी जेवणात हायग्लुकोमिक इंडेक्स फूड म्हणजे गोड पदार्थ टाळावे आणि नियमित औषधे घ्यावी. नियमितपणे रक्तातील साखर तपासणी करणे देखील आवश्यक आहे.
· धुम्रपान, मद्यपान तसेच वर्ज्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे आवश्यक असते. ज्यामध्ये तंबाखू, गुटखा, बिडी, गांजा आणि अन्य हानिकारक व्यसनांचा पूर्णपणे त्याग करणे महत्त्वाचे असते.
सकस आहार कसा असावा?
“सकस आहार” हा हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडत असतो. संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचा विकार होत नाही. कडधान्य ,डाळी, कमी चरबी असलेले पदार्थ, मासे इ. पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा. साखर आणि मिठाचं अतिप्रमाणात सेवन करू नये .ज्याच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असते, त्यांनी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा .त्यासाठी आहारात तेलयुक्त पदार्थ कमी करणे तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधे नियमितपणे घ्यावी.
व्यायामाला पर्याय नाही !
नियमित व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे चालणं. संशोधनानुसार हृदयविकारास कारणीभूत ठरणारे मुख्य घटक म्हणजे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह. या तिन्ही विकारांना प्रतिबंध करण्यासाठी वेगाने चालणे हा उत्तम उपाय आहे. हा व्यायाम धावण्याइतकाच प्रभावी आहे. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आठवड्यात १५० मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणेदेखील गरजेचे आहे .
तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा!
खूप काळ मानसिक तणाव असल्यास रक्तदाब वाढून त्याचा हृदयावर विपरित परिणाम होऊन ताण येतो. त्यामुळे ताणतणावाचे वेळीच योग्य व्यवस्थापन करा. योगासने आणि श्वसनाचे व्यायाम केल्यास हा तणाव कमी होतो .आनंदी ठेवणारे छंदही जोपासायला हवेत. आनंदी आणि तणावमुक्त राहिल्यामुळे हृदयविकारांची लागण होत नाही .
सायलेंट एम. आय. म्हणजे काय?
अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक येतो तेव्हा छातीत जोरात वेदना होतील आणि त्यांना कळेल की, हार्ट अटॅक आलाय. पण अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणाशिवाय अचानक येतो .याला सायलेंट हार्ट अटॅक असं म्हटलं जातं.
काही वेळा आपण ऐकतो की , अमुक व्यक्ती झोपेत असतानाच मृत्यू पावला . त्यांच्या नातेवाईकांना सकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. म्हणजेच अशा वेळी त्याला सायलेंट हार्ट अटॅक आलेला असतो. अनेकदा अन्य कारणासाठी म्हणजे कोणत्याही शस्त्रक्रियेच्या आधी इसीजी काढला जातो .तेव्हा लक्षात येतं की त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो. यालाच सायलेंट एम. आय.असे म्हणतात. वास्तविक पाहता अशा रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असतातच . उदा .त्यांच्या छातीत जडपणा येतो, सौम्य प्रमाणात छातीत दुखत असतं, काम करताना धाप लागते किंवा खांदेही दुखतात... अशी लक्षणे आढळल्यास रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतो .अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासण्या करणे अतिशय आवश्यक असते. यामुळे आपण सायलेंट एम. आय. टाळू शकतो.
या वर्षीची जागतिक हृदय दिवसाची थीम आहे, “Cardiovascular health for everyone ” म्हणजे प्रत्येकानं आपल्या हृदयाचं आरोग्य जपणं. कारण आरोग्यदायी हृदय हीच आपल्या आनंदाची गुरुकिल्ली आहे .
डॉ. गणेश बनसोड
M.B.B.S., M.D.