संपादकीय

सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: !
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःखभाग भवेत !

या पृथ्वीतलावरील सगळे जीव सुखी होवोत, सगळे जीव निरोगी राहोत. सगळया जीवांचे कल्याण होवो, कुणालाही दुख्: भोगावे लागु नये, हीच मंगलमय प्रार्थना करीत निरामयच्या या अंकाचे व विशेषत: माझे प्रथम संपादकीय लिहिते आहे आणि ते लिहितांना मनात विविध भावनांची गर्दी झालेली आहे. तशीच थोडी धाकधुकही आहे.

अश्निन शुद्ध प्रतिपदेचा हा अंक आपल्यापुढे सादर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे हे दशकपुर्ती वर्ष आहे.

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे हे दशकपूर्ती वर्ष आहे. त्या निमीत्ताने गेले वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत . त्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे , तज्ञ डॉक्टारांकडुन विविध विषयांवर शाळा व कॉलेजांमधुन मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबरच “धारिणी “- ‍स्त्रियांच्या आरोग्यावर केंद्रित असण्या-या वैद्यकिय संम्मेलनाचे भव्य आयोजनदेखील करण्यात आले होते. या संमेलनाच्या निमित्ताने स्त्रियांच्या जीवनात सर्वसामान्यापणे येणाऱ्या आजारांवर चर्चा तर झालीच, पण आरोग्या क्षेत्रात व समाजासाठी झटणाऱ्या व विशेष कर्तृत्व असणाऱ्या तीन तेजस्विनींचा सन्मान देखील करण्यात आला व त्यांच्या बहुमुल्य कार्याबद्वल माहिती देण्यात आली.

श्रावणात निसर्गात होणाऱ्या असंख्या बदलांचा आपण अनुभव होत असतो. ते इतके सुंदर व मनोरम असतात की, कवी विं. दा. करंदीकरांनी –

“ब्रह्म जाहले धरणीला वश, अशा प्रसंगी

आत कुठेसे मला टोचते मातीचे यश”

अशा शब्दात अगदी कविमनालाही हेवा वाटणाऱ्या पृथ्वीतलाचे दर्शन घडवले आहे. असे म्हणतात की श्रावणात धरिणीवर जे पेरले ते उगवते. एक संस्कारक्षम मनदेखील या मातीपेक्षा वेगळे नाही. या मनात जे सुंदर विचार पेरले जातील ते नक्कीच चांगल्या ‍कृतीच्या रुपाने दिसुन येतील, याचा प्रत्याय ऑगस्ट ‍ महिन्यात पार पडलेल्या सेवांकुरच्या निवासी ‍शिबीराच्या माध्यामातुन आला. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक डॉ. यशोधन बोधनकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तब्ब्ल ५५ वैद्यकिय विद्यार्थ्यानी या शिबीराचा लाभ घेतला. सांघिक खेळ, योगासने, मान्यवरांचे विचार , भाषणे इ. असे शिबीराचे स्वरुप होते. त्या सर्वच विदयार्थ्याचा उत्साह, समाजाप्रती कार्य करण्याची उत्सुकता पाहुन आनंद झाला. सेवांकुरच्या माध्यामातुन असेच उपक्रम व समाजकार्य भविष्यातही व्हावेत व भावी तरुण वर्गाला प्रेरणा मिळावी हीच सदिच्छा !

२९ सप्टेंबर हा ‍दिवस जागतिक हृदय दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आपल्या हदयाची काळजी कशी घ्यावी व काही त्रास झाल्यास काय करावे , याबाबत जनजागृती करणे, हेच याचे प्रयोजन आहे. याच विषयावर फिजिशियन डॉ. गणेश बनसोड –एम.डी.यांचा “आपले हृदय सांभाळा” हा लेख आहे. “गर्भावस्थेतील डायबेटीस”ही गंभीर समस्या सध्याच्या काळात उद्भवली आहे. याची कारणे व त्यामध्ये घ्यावयाची काळजी या बाबत डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमधील मधुमेह व थायरॉइड तज्ञ डॉ.विनीत साबू सरांचा “ प्रेगनन्सिमधील मधुमेह “ हा मार्गदर्शनपर लेख समाविस्ट आहे.

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील नैराश्य , उदासीनता हे आजार दिसून येतात. हसण्या खेळण्याचा व सर्वांगीण वाढीच्या वयात जवळच्या व्यक्तींकडून दुर्लक्ष किंवा शोषण ,घरगुती हिंसाचार , घरात तणावाचे वातावरण , व्यसनाधीनता इत्यादीमुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असतात . या विषयावरील , "अखेर मार्ग सापडला “ हा लेख आपल्याच हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ञ डॉ. अक्षय चांदुरकर सरांनी लिहिला आहे.

“प्रत्यक्षाहुनि प्रयत्न सुंदर “असा अनुभव ज्यामुळे आला , ती धारिणी ,या संमेलनाच्या निमित्याने हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आले. सर्वांनी यथाशक्ती खारीचा वाटा उचलला . तसेच या प्रवासाची व संमेलनाची क्षणचित्रे , तसेच त्याबद्दल माहिती आपणास मिळावी, यासाठी डॉ. मानसी कविमंडन यांचा “धारिणी – सफल संपूर्ण “ हे विशेष दिर्घ लेख या अंकात समाविष्ट केला आहे.

आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत, याच विनंती सह आपला निरोप घेते.

डॉ. प्रज्ञा बनसोड