डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त डिसेंबर २०२१ पासून विविध स्वरूपाचे समाजोन्मुख कार्यक्रम आपण घेत आहो. यामध्ये मुख्यतः विविध आरोग्य तपासणी शिबिरांचा वाटा मोठा आहे. डॉ हेडगेवार हॉस्पिटल व भाराणी मेमोरियल क्रिटिकल केयर युनिट या दोन्हींमधील अनेक डॉक्टर्स या शिबिरांमध्ये सहभागी होत आले आहेत. दशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेतील एक मोठा व महत्वाचा कार्यक्रम वैद्यकीय परिषद अर्थात मेडिकल कॉन्फरन्सच्या रूपाने ऑगस्ट महिन्यात संपन्न झाला.
स्त्रियांच्या आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध शाखांच्या तज्ञांनी त्या समस्येचा सर्वंकष उहापोह करणारी चर्चा करावी अशी मूळ संकल्पना ठरली. स्त्रीचा सन्मान करणारे ' धारिणी - द फेमिकॉन ' असे चित्तवेधक नाव या कॉन्फरन्सला देण्यात आले. साधारण फेब्रुवारी महिन्यात धारिणीला साकार करण्याची तयारी सुरु झाली. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमधील सर्व शाखांचे तज्ञ उत्साहाने एकत्र आले. पुढील सहा महिने सर्वांना एकाच ध्यास होता - धारिणी!
२ दिवसांच्या कॉन्फरन्स मध्ये वैद्यकीय विषयांवर चर्चा व प्रश्नोत्तरे व त्याशिवाय विषयाला धरून पण सामाजिक जाणिवेच्या अंगाने जाणारा उदघाटनाचा कार्यक्रम असे साधारण स्वरूप ठरले. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी, अधिकारी अशा डॉक्टर वक्त्यांचा त्या त्या विषयावर बोलण्यासाठी शोध सुरु केला. महिलांच्या आरोग्य समस्यांमधील काही महत्वाचे विषय सर्वानुमते निश्चित केले गेले. ' धारिणी' चे वेगळेपण असे की यापैकी प्रत्येक विषयावर बहुआयामी चर्चा आयोजित केली होती. कोणत्याही समस्येसाठी रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याच्या समस्येचे निदान व उपचार करण्यामध्ये अनेक स्पेशॅलिटीचे डॉक्टर सामील होत असतात. स्तनाचा कर्करोग, थायरॉईडचे आजार यांचे अचूक निदान करण्यामध्ये पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट यांचा खूप मोठा वाटा असतो. शल्यक्रियेसोबत इतर उपचार पद्धती अनेक वेळा वापराव्या लागतात. त्यामुळे एखाद्या समस्येवर सर्व संबंधित तज्ञांची एकत्र चर्चा घडवून प्रत्येक स्पेशॅलिटीचा त्यावरील दृष्टिकोन, त्यातील नवनवीन तंत्रज्ञान, त्याचे बारकावे या सर्वांवर प्रकाश पडणार होता. कोणत्याही स्पेशॅलिटीच्या डॉक्टरांसाठी कॉन्फरन्स मध्ये ऐकण्यासारखे, घेण्यासारखे काही ना काही असणार होते. कर्करोगावरील उपचार व संशोधन क्षेत्रात भारतात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील चार वरिष्ठ तज्ञ स्तनाच्या कर्करोगाच्या अनेक पैलूंवर भाष्य करण्यासाठी ' धारिणी ' मध्ये सहभागी झाले. मेळघाटात अनेक वर्षे प्रतिकूल परिस्थितीत देखील अत्यंत क्लिष्ट अशा थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे डॉ. कापरे सर व नागपूरचे इतर नामांकित तज्ञ थायरॉईड वर चर्चा करण्यासाठी आले. रजोनिवृत्तीच्या विषयावर अमरावतीच्याच सुप्रसिद्ध डॉ. सोमवंशी मॅडम तर बोलल्याच पण या काळात येणाऱ्या हाडांच्या ठिसूळतेच्या समस्येवर बोलण्यासाठी खास मुंबईहून एक वरिष्ठ महिला अस्थिरोगतज्ञ आल्या! या काळातल्या मानसिक आंदोलनांवर प्रकाश टाकणारे मुंबईच्या मनोविकारतज्ञ डॉ. जान्हवी केदारे यांचे वक्तव्य झाले. बदलत्या काळात पौगंडावस्थेतील मुलींच्या समस्यांवर अतिशय उत्स्फूर्त चर्चा झाली, खूप धक्कादायक आणि चिंतेत टाकणाऱ्या बाबी समोर आल्या त्यासोबत उपायांवरही चर्चा झाली. एकूण हा दिवसभराचा ' सायंटिफिक प्रोग्रॅम ' अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चांचा झाला व सहभागी डॉक्टर्स तसेच श्रोते डॉक्टर्स यांना अद्ययावत, वैविध्यपूर्ण आणि सर्वंकष माहिती मिळाली.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना स्त्रीशक्तीचा सन्मान केला जावा यावर सर्वांचे एकमत होते. आरोग्य व सामाजिक क्षेत्रात आपले असामान्य कर्तृत्व ज्यांनी सिद्ध केले आहे अशा ' तेजस्विनी ' डोळ्यासमोर होत्या. या तिघींचा सन्मान करणे व त्यांच्या कार्याचा श्रोतृवर्गाला थोडक्यात परिचय करून देणे हा २० तारखेच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग होता. नागपूरच्या निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या डॉ. उर्मिला क्षीरसागर, संपूर्ण बांबू केंद्र , लवादा मेळघाट च्या डॉ. निरुपमा देशपांडे, व मुंबईच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. तरु शहा या त्या तीन तेजस्विनी होत. त्यांच्या कार्याबद्दल एका लेखात लिहू म्हटले तर तो त्या विषयावर अन्याय होईल, पण वाचकांना हा परिचय आम्ही निरामयच्या पुढील अंकांमधून अवश्य करून देऊ. या महिलांच्या कार्याचा केवळ ओझरता आलेख पाहून उपस्थित सर्व वयोगटांतील डॉक्टर्स, सेवांकुरचे वैद्यकीय विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती हे सर्व जण प्रभावित झाले. मुंबईहून या परिषदेला आलेल्या डॉक्टर्सनी या कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे प्रकल्प संचालक डॉ. यशोधन बोधनकर यांनी हॉस्पिटलचा अगदी शून्यापासून झालेला प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. दहा वर्षांच्या काळात हॉस्पिटलने केलेली प्रगती व रुग्णांसाठी केलेले भरीव काम हे सर्वांच्या कौतुकास पात्र झाले. हॉस्पिटलमधील १० डॉक्टर्स नी दशकपूर्ती वर्षानिमित्त होणाऱ्या कॉन्फरन्स मध्ये आपल्या विषयानुरूप महिला स्वास्थ्याबद्दल थोडक्यात लेक्चर दिले. हे ' रॅपिड फायर टॉक्स ' खूप परिणामकारक झाले.
कॉन्फरन्सला तब्बल ३६० 'रेजिस्ट्रेशन्स ' चा प्रतिसाद मिळाला. डॉक्टर्सची उपस्थिती उल्लेखनीय होती. अमरावती व आजूबाजूच्या अनेक ठिकाणांहून डॉक्टर्स उपस्थित राहिले. कॉन्फरन्सची मांडणी, आखणी, त्यामागची संकल्पना, वक्त्यांची निवड, वक्तशीरपणा, व्यवस्था, भोजन-प्रबंध अशा अक्षरशः सर्व बाबींची सर्व उपस्थितांनी वाखाणणी केली. कॉन्फरन्स यशस्वी झाली! स्वतःपलीकडे विचार करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी कार्यरत असणाऱ्या एका वेगळ्या स्वास्थ्य प्रकल्पाला मान्यतेची व प्रशंसेची पावती सर्वांनी अगदी मुक्तकंठाने दिली!!
-डॉ. मानसी कविमंडन