निरोसायकियाट्रिस्ट ची डायरी

बालरोग तज्ञ डॉक्टरांनी माझ्याकडे एक १४ वर्षांचा मुलगा पाठविला. सोबत त्याची आई होती. त्या मुलाची नजर शून्यात होती, भावना शून्य झाला होता तो . हे सगळे जग खोटेपणाने भरले आहे. जगात त्याचे कोणी नाही, समाज त्याच्याबरोबर नाही ... तो अगदी एकटा आहे... त्याची भावना, चिंता ,निराशा आणि कोणीही जाणून घेऊ शकत नाही . तो निराश झालाय , सतत रडतो आहे.

दिवसभर करतो तरी काय तो ? दिवसभर उदासीनतेची भावना त्याला घेरून आहे. खेळणे, हसणे , एखादा छंद जोपासणे , कला, क्रीडा ...सारे तो विसरलाय. त्याची भूक कमी झालीय. निराशेने मरणाचे, आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येतात .गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या या तक्रारीत वाढच झाली आहे.

या मुलाचा पूर्वी कोणताही प्रसवपूर्व, जन्मापुर्वीचा , नंतरचा, वैद्यकीय, शस्त्रक्रिया, काही आजार असा त्रास नव्हता , नाही . ( मात्र तो लहान असतानाच त्याच्या मनावर ताण होता. घरी अशांतता होती, कलह होते. नंतर त्याचे आई – बाबा विभक्त झाले. त्याच्या मनावर मानसिक आघात झाला. ) वडील चीद्चीडे आणि रंगीत होते. त्यातच ते व्यसनी होते, दारुडे होते. ते कधी त्याला तर कधी आईला मारहाण करीत असत.त्यामुळे आईची जवळीक त्याला हवीहवीशी वाटू लागली .वडिलांपासून तो मनाने हळूहळू दूर गेलं. नात्यातील इतर आप्तांनी प्रयत्न केले , पण घरातील वातावरण बदलले नाही. अखेर त्याचे आई बाबा विभक्त झाले. माझ्या दवाखान्यात आलेला हा मुलगा आणि त्याची आई दुसर्या घरात राहावयास गेले. त्याची आई उदरनिर्वाहासाठी नोकरी करू लागली.

आता घरी तो एकटा असे किंवा त्याची आजी त्याच्या सोबत असे. त्यातच कोविड काळात शाळा बंद झाल्या. कोणाकडे जाणे, येणे, खेळणे, गप्पा, मित्र आणि आप्तांच्या भेटी बंद झाल्या. या काळात त्याचा एकटेपणा वाढत गेलं. आई वडील याच काळात विभक्त झाल्याने कधी कोणी टोमणे मारीत, कोणी हेटाळणी करीत, काहीबाही प्रश्न विचारीत असत. यामुळे त्याचे मित्र, आप्त, समाजात जाणे येणे , मिसळणे कमी झाले. त्याच्या भावनांचा पार चुराडा झाला. तो हताश झाला. कधी एकदा कोरोना संपतो, असे त्याला झाले.

अशा काळात त्याला जवळची होती आई ! आई तर नोकरी करीत होती. तो तिला तेथे सतत फोन करीत असे. चिडचिड करीत असे, तर कधी रडत असे. काय करावे आईलाही कळेना. अती झाले की घरी थोडा वेळ येई आणि परत ऑफिसला जात असे. तिचाही नाईलाज होता . नोकरीतही तिला यामुळे कधी कधी ऐकून घ्यावे लागे. यामुळे मुलाची एकटेपणाची भावना तीव्र झाली, वाढीला लागली. तिने अखेर त्यांचे नेहमीचे बाल रोग तज्ञ डॉक्टरांना ही समस्या सांगितली. तेव्हा त्यांनी त्या मुलाला आणि आईला माझ्याकडे समुपदेशनासाठी पाठविले.

मुलाला वास्तविक जग आणि आणि त्यच्या मनातील निराशा , एकटेपणा , असुरक्षितता या लक्षणासह निष्कर्ष काढले, मुल्यांकन केले आणि औषधोपचार आणि समुपदेशन सुरु केले . हळूहळू एक महिन्यातच मुलाची मानसिकता बदलली. खरं तर आताही घर तेच, वातावरण तेच, तीच परिस्थिती असतानाही त्याच्यात ५० टक्के बदल झाला. मूड बदलला. तो इतर गोष्टीत रस घेऊ लागला. त्याची तीव्र निराशा आणि एकटेपणाची भवना, जगाविषयीची चीड कमी झाली. तो सामान्य मुलांसारखा जीवनात आनंद शोधू शकला .दोन महिन्याच्या औषधाने आणि समुपदेशनाने त्याच्यात ८० – ९० टक्के बदल झाला. पूर्वीसारखा चित्र काढणे त्याला आवडू लागलेय, स्केटिंग मध्ये तो रमू लागला आहे. सध्या त्याला एकच औषध सुरु आहे. ते देखील हळूहळू कमी होईल आणि नंतर बंद होईल. अडचणी सगळ्यांना असतात. पण त्यावर मात करीत आणि तडजोड करीत जगायचे असते, हे वास्तव त्याला उमगले. त्याला आणि त्याच्या आईनेही थोडे बदल स्वीकारले आणि समस्या दूर झाली. पुढील आयुष्यात आनंदी, समाधानी राहणे आणि समाजोपयोगी कार्यात वेळ घालविल्यास जीवन सुंदर आहे, हे त्याला नक्कीच पटेल, ही आशा आहे .

 

डॉ.अक्षय चांदुरकर

समुपदेशक,
डॉ. हेडगेवार हॉस्पीटल , अमरावती .
M.B.B.S.D.N.B.F.I.C.A.P.