भारताला "डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड" असे म्हणतात. कारण भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले मधुमेहग्रस्तांचे प्रमाण फार मोठे आहे . मधुमेहाचा विचार केल्यास यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे मधुमेह आढळतात .
अ )टाईप २डायबिटीज
ब )टाईप १ डायबिटीज
क) प्रेग्नंसी -गरोदरपणातील मधुमेह.
यापैकी गरोदरपणातील मधुमेह जवळपास दहा -बारा टक्के गरोदर मातांना होतो . हा मधुमेह होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
आहार सेवनाच्या अयोग्य पद्धती:-
नैसर्गिक वस्तूंपेक्षा प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाण्यांमुळे लठ्ठपणा व मधुमेह ,उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण वाढते आहे .
*वाढते वय : _
पूर्वीच्या काळात विशी , बाविशीत मुलींचा विवाह होत असे .अलिकडे करिअरमुळे व अन्य वैयक्तिक कारणांमुळे मुलींचे लग्नाचे वय वाढते आहे . पर्यायाने गरोदरपणाचे वयसुद्धा वाढत आहे. त्यामुळे गरोदरपणातील मधुमेहसुद्धा वाढतो आहे.
परिवारामध्ये मधुमेह असणे
ज्या व्यक्तीच्या परिवारात आई, वडील, बहिण, भाऊ यापैकी या कुणाला मधुमेह असल्यास नंतरच्या पिढीमध्ये मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते . तसेच ज्या महिलांना पहिल्या गरोदरपणामध्ये मधुमेह असतो त्यांना नंतरच्या गरोदरपणामध्ये सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता असते.
लक्षणे
गरोदरपणामध्ये होणाऱ्या मधुमेहाची फारशी लक्षणे आढळून येत नाहीत . मात्र असे आढळून आले आहे की, ज्यांच्या मानेच्या मागच्या भागाला काळपटपणा असतो ,त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
तपासणी कधी करावी?
प्रेग्नन्सीचे - गरोदरपणाचे निदान झाल्याबरोबर शुगर तपासणी करायला हवी. त्यानंतर विसाव्या आणि चोविसाव्या आठवड्यात शुगर तपासणी करायला पाहिजे .
मधुमेहाचे परिणाम
१ )बाळाचे वजन वाढणे.
२ )वेळे अगोदर बाळंतपण होणे.
३ ) बाळाला श्वसनाचा त्रास होणे.
४ ) बाळाला जॉन्डिस - काविळ होणे .
५ ) बाळाला भविष्यात मधुमेह होणे.
उपचार
१ )आहाराचे पथ्य पाळावे.
२ )आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा.
३ ) काहींना इन्सुलिनची आवश्यकता लागू शकते.
स्त्री जीवनात बाळाला जन्म देण्याची महत्वाची जबाबदारी आहे . त्यामुळे आई ठणठणित तर बाळ निरोगी राहते . म्हणूनच गर्भवती महिलांना प्रकृतीची तक्रार असल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा . वेळीच उपचार घेतल्यास अनर्थ टळू शकतो.
डॉ. विनित साबू,
मधुमेह आणि थायरॉईड तज्ञ
डॉ . हेडगेवार हॉस्पीटल , अमरावती .