एक पाऊल पर्यावरणाकडे: प्लास्टिकला पर्याय - कापडी पिशवी

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले.... प्रत्येकासाठी तर आपण काही करू शकत नाही ... पण आमच्या जनकल्याण सेवा संस्थेकडे अंबागेटच्या आत छोटी जागा आहे. त्या जागेचा सदुपयोग करून कोणाला रोजगार देऊ शकू का ?काय करावे नेमके ? नक्की ठरत नव्हते. अनेक प्रश्न मनात होते. या संदर्भात आमच्या संस्थेने, विश्वस्तांनी फॅशन डिझायनर युगंधरा जामकर हिची भेट करून दिली आणि विचारचक्र सुरु झाले.

विश्वस्तांनी सुचवले, पर्यावरण प्रदुषणाला आळा घालण्यासाठी म्हणून कापडी पिशवी शिवून घेऊया . अलिकडे पर्यावरण समस्या गंभीर झाली आहे. यामुळे प्लास्टिक पिशवी बंदी आली आहे. मग विविध प्रकारच्या कापडी पिशवी तयार करून युगंधराने द्याव्या. तिला रोजगार मिळेल. काहीतरी हातभार लावू शकू ...कसा प्रतिसाद मिळतो, पाहूया तर... असा विचार करून साडीच्या पिशवी शिवून घेणे सुरु केले. त्याला प्रतिसाद मिळाला . पण आता आम्ही घरून आणलेल्या साड्या संपत आल्या होत्या. मग मदतीचा हात पुढे आला . काही स्नेही मंडळीने पुढाकार घेतला आणि हा उपक्रम सुरु राहिला. खरेदीसाठी छोटे व्यावसायिक, भाजीविक्रेते, शाळा, संस्था, दुकानदार पुढे आले ... हॉस्पिटलला आलेले मान्यवरांची शाल, रोपटे ठेवण्यासाठी दिले गेले . हा उपक्रम सातत्याने सध्यातरी सुरु आहे.

नवजात बाळांना बाळंत विडे

कापडी पिशवीला प्रतिसाद मिळाला . आमच्या प्रयत्नांना यश आले. आता आणखी काय करता येईल ? हा विचार पुन्हा मनात घोळू लागला . आम्हाला आठवले, हॉस्पिटलचे आमचे उपक्रम. १. संत गाडगेबाबा शहर सेवावस्ती आरोग्य प्रकल्प २. ग्रामीण भागात मोबाईल डिस्पेनसरी,३. संवेदना आरोग्य सेवा प्रकल्प –टिमटाला ४. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच तपासणी सेवा – अक्षय वट योजना ५.रुग्ण सेवा सदन हे सेवाभावी उपक्रम आहेतच.

मग आपण काय करू शकतो ? आणि .... अचानक आठवण झाली, आमचे सर्वांचे आदर्श असलेल्या औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाची. या रुग्णालयाला भेट दिली होती तेव्हा त्या रुग्णालयात सुरु असलेला एक आदर्श उपक्रम, नवजात बाळांना बाळंत विडे देणे, हा उपक्रम फार भावला होता. कारण अनेकांकडे लहान बाळाचे सुती कपडे नसतात....मग युगंधराला ही संकल्पना सांगितली. तिने उत्साहाने होकार दिला आणि सुंदर दुपटे, झबले, टोपी,लंगोट शिवले. श्री रामनवमीच्या नवरात्राच्या शुभ मुहूर्ताला या उपक्रमचा शुभारंभ झाला. हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झालेल्या नवजात अर्भकांना लगेच मऊसूत, सुती दुपट्यात गुंडाळून बाळ आप्तांच्या हाती हळूच सोपवताना आनंद होतो. बाळाच्या नाजूक कातडीला इजा होऊ नये, यासाठी घेतलेले प्रयत्न सार्थकी लागले आहेत, हे नक्की. संस्था आणि हितचिंतक नेहमीप्रमाणे पाठीशी आहेत ...ही सुखद प्रचित्ती असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला बळ देते. हा स्नेह अखंड असू डे, हीच आई अम्बाबाईच्या चरणी प्रार्थना.

 

वनिता काविमंडन – अनिता कुळकर्णी