देहेबुदधी ते आत्मबुद्धी करावी

Lockdown-unlock, कोरोना , संचारबंदी अशा सगळ्या अवस्थांमधून जीवनगाडी सुरळीत ? सुरू असतानाच एक दिवस म्हणजे १५ फेब्रुवारी च्या रात्री भरपूर थंडी वाजून गायत्रीला ताप भरला. अंग प्रचंड दुखत होतं.सारखी तहान लागत होती, खूप थंडी वाजत होती आणि फक्त झोपूनच रहावं असं वाटत होतं. मनात आधी आलं हा flue चा ताप असावा किंवा फार तर मलेरिया असेल. पण डॉक्टर, तपासण्या, रिपोर्टस् चा सगळ्याच्या अंती "जोर का धक्का sssss धीssरेसे लगे " च्या थाटात सगळं घर हालून गेलं. गायत्री कोरोना पॉझिटिव्ह! मग पुन्हा काही आणखी तपासण्या, सीटी स्कॅन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या सगळ्यांच्या अंती,  फिर फिरून झाल्यावर , मुठभर गोळ्यांच्या सहाय्याने आणि ex.corona sufferers च्या अनमोल सल्ला मार्गदर्शनानंचं नवनीत बुद्धीला देत देत गायत्री बाईची कोरोना पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे मंद ? वाटचाल सुरू झाली. १७ दिवसांच्या होम quarantineच्या पाऊलवाटेवर!!

      गेल्या अनेक दिवसांच्या अत्यंत बिझी लाईफ नंतर अचानक एकदम रिकामे चोविस तास फेर धरू लागले. सुरवातीचे आठ दिवस बर्यापैकी झोपण्यात गेले. कारण फार काही उठून बसण्याचा staminach नव्हता. पण जसजसा ताप कमी झाला, औषधं काम करू लागली , आणि मेंदूही  झोपेव्यतिरिक्त इतरही गोष्टींची मागणी करू लागला, इतक्या ढीगभर वेळाचं करायचं काय? हा प्रश्न सतावायला लागला, तेव्हा वेळेचं काही तरी सुनियोजन करायलाच हवं असं वाटू लागलं.

      टिव्हीच्या भ्रमणावर रिमोटला हात लावायचाच नसल्यामुळे जाण्याचा प्रश्नच नव्हता.माझ्या एका खोलीबाहेर सुद्धा पडायचंच नव्हतं. म्हणजे जवळजवळ २०-२१ दिवस अमाप वेळ आणि आपण! आईदादांना सेफ म्हणून यवतमाळला पाठवलेलं. आणि घरातलं छोटं बाळ तिच्या आईसह तिच्या माहेरी धाडलेलं, सुरक्षित, विलगीकरण म्हणून! कोरोनाग्रस्तांची संख्या गावात वाढल्यामुळे पुन्हा नव्याने लाॅकडाऊन लागलेलं. रस्त्यावर शुकशुकाट! घरात सामसूम, मनात निवांतपणा. आजाराचा अंमल अजून उरला आहेच त्यामुळे डोळ्यांवर झापड. मग काय, स्वतः च्या मन:कपाटिकेत विचारात रहायला सगळंच काही अनुकूल!

इतके दिवस इतकं सगळं सांभाळत होतो, मास्क, हातपाय वारंवार धुणं, ड्युटी हून आल्यावर आंघोळ, कपडे धुणं, जपून रहाणं, कामाव्यतिरिक्त इतर कुठेही न जाणं. लगन समारंभात कितीही अगत्याचं निमंत्रण असलं तरीही जाण्याचं टाळणं. एक नव्हे, सतरा गोष्टी.

      तरीही जे व्हायला नको तेच, ज्याला टाळत होतो तेच आपल्या द्रोणातल्या प्रसादासारखं पुढ्यात आलं. ( असं आता म्हणतेय, पण त्रागा, त्रागा झालाच होता खरं तर. )

      आपल्यालाच का झालं? हट बा ! मला नाही पटला हा पाझिटिव्ह रिपोर्ट! मला असं व्हायला नको. मला नाही व्हायचं एडमिट ! एक नाही, दहा गोष्टी! पण जरा वेळानी मनातला गढूळ गाळ तळाशी बसला आणि 'आतली' गायत्री नेहमीप्रमाणे बोलली, ' जे होतं ते चांगल्या साठीच'! यावर तर तोडंच नाही. दिवसभर हेझालं आता ते करायचं आहे, ही मालिकाच तुटून पडली. काहीच करायचं नाहीये. स्वयंपाक घरात नो एंट्री. ऑफिस, हास्पिटल नो ड्युटी. ना कुठल्याच कटकटी! मला व्यंकटेश स्तोत्र आठवलं. 'धाव पाव रे गोविंदा, हाती घेवोनिया गदा ! करी माझ्या कर्माचा चेंदा! सच्चिदानंदा श्रीहरी! '

      हे मी केलं, ते मला करायचंय. असं मी करणार आहे, तसं मला करावंच लागेल. सगळ्या 'मी- माझं ' चा चेंदा करायला  सच्चिदानंद श्रीहरी हातात कोरोनारूपी गदा घेऊन उभा ठाकलाच असं वाटलं. हे बघ, तू काही नाही केलं तरी उर्वरित सगळं घर जेवतंय आणि तुलाही जेऊ घालतंय आणि सगळं काही सुरळीत सुरू आहे. कुलूप लावलं का? अन्न काढलं का? दूध तापवलं का? विरजण घातलं का? भाजी निवडली का? यातलं काहीच विचारू नकोस आणि करू तर नकोच नको. .... कर्माचा चेंदा!! होतोच आहे! यासाठीच आलाय हा कोरोना पाहुणा!

आजारपणामुळे जिभेला चव नाहीये. आवाज खोल गेलेला. नाकाला वास येत नाही. बोलायला खूप कष्ट होताहेत. झोपून रहावं वाटतंय. मला माझ्या लाडक्या 'मंदाताई गंधेंचं' प्रवचन आठवतंय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध! आपल्या पंचज्ञानेंद्रियांची ही पाच कर्म! म्हणायला कर्म आहेत,पण आपण याचा उपयोग कसा आणि किती करून घेतोय?  सर्वात जास्त दुरूपयोग... कशाला पापंच डोळे करतात! त्या खालोखाल जीभ! रसना म्हणून आणि दुधारी तलवार म्हणून सुद्धा! डोळे नको ते पाहण्यात,  जीभ अती खाण्यात आणि कुणालाही जहरी बोलून दुखावण्यात कधीही पुढेच! या पंचज्ञानेंद्रियांना जरा आराम नको का? किती बोलशील? किती या रसनेचे चोचले पुरवशील? किती डोळे फाडून बघशील? जरा डोळे मिटून आत बघ, जरा रसनेला निवांतपणा दे! त्यासाठीच आलाय हा कोरोना पाहुणा! डोळ्यांवर पापण्यांची अन् जिभेवर ओठांची कवाडं त्यासाठीच तर दिली आहेत देवानं! बाकीच्या गोष्टीनी म्हणजे दोन कान, दोन नाकपुड्या, दोन हात, दोन पाय, अंगभर उघडी त्वचा यांनी त्यामानानं माणूस कमी पापं करतो. पण जिभेनी आणि डोळ्यांनी अगणित! म्हणून त्यावर ही बंद करायची सोय ठेवली आहे. तेव्हा आता जरा कमी बोल, कमी बघ, कमी खा. काsssही बिघडत नाही.त्यामुळे ' म्हणूनच आलाय हा कोरोना पाहुणा' हे लक्षात घे! स्वतः न बनवता, न शिजवता, जे जेव्हा जसं वाढलं जातंय अन्न, ते तसं आनंदानी खायला शीक! 'मी ' चं टोक जरा छिललं जाऊ दे! मी जाता राहील कार्य काय? ' याचं उत्तर मिळालं नं? तरीही ते मिळाल्यावर , कळल्यावरही आकलून येत नसेल तर सांभाळ हा पाहुणा! किती हिंड-फीर चालते सतत या देहाची आपल्या! त्यांना आई-दादांच्या भूमिकेत शिरून, ' कुठेही हिंडायचं नाही' हे जरा शिकवून बघ! काही दिवसांसाठी तरी बघ.

      अजून एक गंमत सांगते. ताप आलाय. देहाला आलाय, SpO2 कमी झालंय, देहाचं झालंय. थंडी वाजतेय, देहाला वाजतेय. तहान लागतेय, देहाला लागतेय. झोप येतेय , देहाला येतेय. थकवा आलाय, देहाला आलाय. अंग दुखतंय, देहाचं दुखतंय. केस गळताहेत, देहाचे गळताहेत. असा पाढा वाचता येऊ लागला. जे काही होतंय, ते देहाला होतंय, गायत्रीला नाही, कारण गागायत्री म्हणजे देह नाही. देहात ठेवलेली एक उडती तबकडी आहे.असा अभ्यास रोज होणं वाढलं आणि मजा वाटली. त्यामुळेच कोरोना पॉझिटिव्ह पाहुण्यापाई आलेली निगेटिव्हीटी हळूहळू उलटा प्रवास करू लागली. नकारात्मकते कडून सकारात्मकतेकडे जाणं सुरू झालं. वेळेचा सदुपयोग व्हायला माऊलींची ज्ञानेश्वरी, महाराजांची प्रवचनं,

संध्याकाळचा नित्यपाठ, रामरक्षा, नामजपाची वही , जमेल तेवढा माळेवर जप किंवा मग अजपाजप,

वंदनीय सद्गुरू श्रीराम महाराजांचं स्मरण आणि सद्वचन आणि भरपूर प्रमाणात मिळेल तिथून मंदाताईं गंधेंची प्रवचनं या साऱ्या टाइमटेबल मुळे हे रिकामपण चक्क भारलेपणात परिवर्तित झालंय. देहाचं वजन पूर्वी इतकंच आहे बरं!

      'देहेबुदधी ते आत्मबुद्धी करावी' हे समर्थांचं वचन पाळायचंय नं म्हणून !!

सौ. गायत्री दीपक फडणीस