पडलेल्या दाताचे करा जतन

सुंदर निरोगी दात मानवी सौंदर्यातही भर घालतात. दंतवल्क हे अर्धपारदर्शक (Translucent) असते, त्यामुळे  दाताला पांढरा रंग येतो. संपूर्ण दात हा दंतिनापासून बनलेला असतो. दंतिन हा कॅल्शिअमयुक्त उतींपासून बनलेला असून याच्या बाहेरील बाजूवर दंतवल्काचे आवरण असते, तर हिरडीच्या आतील बाजूस दंतमुळावर संधानकाचे (Cementum) आवरण असते. त्यावर असलेल्या परिदंत आवरणाने दात हिरड्यांना घट्टपणे जोडलेले असतात. दुधातील केसीन प्रथिनाचे रेणू कॅल्शियम फॉस्फेटने जोडलेले असल्यामुळे केसीनचे विघटन होताना कॅल्शियमचे शोषण होते. दात म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. सौंदर्य तर दातांवर अवलंबून असतेच पण आपले आरोग्य, अन्न  पचन दातांवरच अवलंबून असल्याने दात महत्वाचे आहेत. मात्र दाताला जपावे लागते, त्याची निगा राखावी लागते.

दातांची रचना

      जबड्याच्या पुढील भागात चपटे दात (Incisors) असून ते अन्न तोडण्यासाठी वापरले जातात. या दातांच्या शेजारी थोड्या मागील बाजूस टोकदार सुळे (Canines) असतात. अन्नावरील कठीण आवरण सोलून काढण्यासाठी यांचा वापर होतो. सुळ्यांच्या मागे उपदाढा (Premolars) आणि दाढा (Molars) असतात. सुरुवातीला दाताचा आकार लहान गोळीसारखा असतो. हळूहळू त्याला परिपूर्ण आकार मिळतो. मानवामध्ये दुधाचे दात व कायमचे दात असे दोनवेळा दात येतात. दुधाच्या दातांची संख्या प्रत्येक जबड्यात दहा-दहा अशी दोन्ही मिळून वीस असते. प्रत्येक जबड्यात ४ पटाशीचे दात, २ सुळे  व ४ दाढा असतात. वयाच्या सातव्या ते अकराव्या वर्षांपर्यंत दुधाचे दात आले त्या क्रमाने पडतात व त्या जागी नवीन दात येतात, त्यांना कायमचे दात म्हणतात. सर्वसाधारणपणे बाराव्या वर्षापर्यंत एकूण २८ दात येतात. अठराव्या वर्षी किंवा त्यानंतर वरच्या आणि खालच्या जबड्यात दोन्ही बाजूंस एक-एक अशा एकूण ४ दाढा येतात. त्यांना अक्कलदाढा (Wisdom teeth) म्हणतात.

      दात स्वच्छ ठेवणे हे मुख आरोग्याचे लक्षण आहे. त्यासाठी मऊ ब्रश व मऊ दंतधावन वापरावे. खडबडीत दंतधावन व कडक ब्रश वापरल्याने दात झिजतात. तसेच दंतमंजन, कडुनिंबाच्या काड्या, त्रिफळा चूर्ण इत्यादींनीही दात घासल्यास दात स्वच्छ होतात. गरम पदार्थांनंतर लगेच थंड पदार्थ किंवा थंड पदार्थांनंतर लगेच गरम पदार्थांचे सेवन करणे यांमुळे दातांवरील संरक्षक कवच  खराब होते. सतत अतिशिजवलेले अन्न खाल्ल्याने दातांना व हिरड्यांना पुरेसा व्यायाम मिळत नाही. दातांचा पुरेसा वापर न झाल्यानेही दात आणि हिरड्या नाजूक तसेच कमजोर होतात. हिरडीमुळे जबड्याच्या हाडात दात पक्के बसलेले असतात.

त्यामुळे हिरड्या सैल पडल्याने दात हलू लागतात व पडतात. आहारात   कडक पदार्थांचा समावेश केल्यास दात व हिरड्या यांना उत्तम व्यायाम मिळू शकतो. दातांमधील अंतर कमी-जास्त असल्यास अशा दातांमध्ये अन्नकण अडकून राहण्याची शक्यता अधिक असते. अशाने दात लवकर किडू शकतात. त्यामुळे जेवणानंतर खळखळून चूळ भरणे तसेच रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आवश्यक आहे. दात कॅल्शिअमयुक्त कठीण संयुगापासून बनलेले असल्यामुळे वर्षे टिकून राहतात. त्यामुळे दंतरचनेचे   संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान आहे.पण तरीही कधीतरी अनेक कारणांनी दात जमविण्याची वेळ येते. तेव्हा काय करावे ?

      तरीही अपघाताने, आजाराने किंवा अन्य काही कारणाने दात पडल्यास तो मुळासकट उखडला जातो याला Avulsion म्हणतात. शाळेत मुलं खेळताना पडतात, ढकलाढकली होते , किंवा सायकल वरून पडतात. अशा वेळी आधी मदतीला धावून जाणे महत्वाचे असते. तो तोंडावर पडल्यास दातांना इजा झाली का, हे पाहणे अगत्याचे असते. दुर्दैवाने दातांवर झालेला आघात जोरदार असेल तर दात मुळापासून उखडला जातो.

      अनेकदा अपघात होतो तेव्हा जखमा , रक्त याकडे लक्ष असते आणि दात पडला तरीही आता काय उपयोग ? म्हणून दुर्लक्ष होते . पण हीच आपली चूक आहे. सर्वप्रथम तो दात उचला. पडलेले दात तेथेच सोडू नका कारण हे दात  पुन्हा लावता येतात.

      पडलेला दात उचलून घेऊन स्वच्छ धुवा. तो त्या खोबणीत ठेवा. असे करणे शक्य नसेल तर औषधी केंद्रात उपलब्ध द्रावण घ्या. सलाइन, दूध, लाळ, कॉन्टॅक्ट लेन्सचे सोल्युशन, नारळ पाणी, अंड्यातील पांढरा बलक ... ताबडतोब दवाखाना गाठा . दंत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अजून काही वेगळा मार असेल, उपचार आवश्यक असतील तर हे पडलेले दात विविध प्रकारच्या सोल्युशन्स मध्ये ठेवले जातात. पालक, शिक्षक आणि सामान्य नागरिकांना ही माहिती असल्यास आपले दात आपण गमावणार नाही . कायम स्वरूपी व्यंग  टाळता येते.

 

डॉ. माधवी पवार - गणोरकर

दंत रोग तज्ज्ञ