इतस्ततः

काही घटना, प्रसंग कायमचे लक्षात राहतात. किंबहुना त्यांचा प्रभाव आयुष्यभर राहतो. मनाच्या कोपऱ्यात खोलवर रुजतो आणि कालांतराने त्याची आठवण येऊन आनंद-दुःखाचा अनुभव येत राहतो. अगदी मरेपर्यंत त्या घटना-प्रसंग आपला पिच्छा सोडत नाहीत. मनावर कायम कोरल्या गेलेल्या अशाच काही घटना येथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

      खामगांव अर्बन बँकेच्या संचालक पदावर निवडून आल्यानंतर मागील 7 वर्षात अनेकवेळा खामगांवला जाण्याचा प्रसंग आला. महिन्यातून एकदा तर नक्कीच, काही वेळा तर महिन्यातून 4-5 वेळाही जावे लागले. हा प्रवासस तसा कंटाळवणाच आहे, शिवाय रस्ता अतिशय खराब  असल्याने प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो. पण जबाबदारी घेतली तर निभावणे आलेच. एकदा असाच खामगांवला जात असताना ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली. गर्दीत पुढे काहीतरी झाले एवढेच कळले आणि प्रवास थांबला. रस्त्यावरच्या कुठल्यातरी छोट्याशा गावात मागे पुढे फसलेली वाहने आणि आम्हीही अडकलेलो. न धड पुढे जाता येत ना मागे. धुळ-धुर आत येणार म्हणून गाडीच्या काचा बंद. गाडी चालक आणि मी असे दोघेच असल्याने किती आणि काय बोलायचे असाही प्रश्न पडतोच. सहजच आजुबाजुला नजर गेली तर काहीतरी विचित्र घडते आहे असे लक्षात आले. मग लक्षपूर्वक बघितले तर काहीतरी विपरित घडतेय असे जाणवले. गाडीपासून ५०-६० मिटरवर एक माऊली आपल्या दारुड्या नवऱ्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती. साधारण ३०-३५ वय असलेली महिला आणि तिचा पती यांची धडपड सुरु होती. नवरा सांभाळायचा, साडीचा पदर सांभाळायचा की आजुबाजूला जमलेल्या बघ्यांच्या नजरा अशी काहीशी विचित्र परिस्थिती त्या महिलेवर ओढवली होती. दारुड्या नवऱ्याला सांभाळणे तिला कठीण जात होते. पण ही घटना काही वेगळी नाही. असे खूप ठिकाणी सतत घडत असते. त्या घटनेतील विशेष म्हणजे त्या जोडप्याची ६-७ वर्षाची मुलगीही तिथेच होती. त्या चिमुरडीची अवस्थ बघून मनाला प्रचंड वेदना झाल्या. ती चिमुरडी इतकी भांबावलेली होती की काय करावे तिला सुचेना. आई-बापाच्या धडपडीत तिला कोण सांभाळणार? सारखी मागे-पुढे ये जा, मध्येच दोन्ही हात तोंडावर ठेऊन हुंदका, खाली बसणे, उभे राहणे अशी त्या चिमुकल्या जीवाची घालमेल सुरु होती. मध्येच कोणातरी वयस्क माणसाजवळ जाऊन ती काहीतरी बोलायची पुन्हा इकडे तिकडे धावायची. तिचा बाप जमिनीवर फतकल मारून बसलेला, त्याला घरी चला म्हणून तगादा लावत सांभाळत बसलेली आई अशी क्लेषदायक घटना मी डोळ्यासमोर बघत होतो. काही वेळाने लुगडं घातलेली एक म्हातारी तिथे आली. बहुतेक दारुड्याची आई असावी. हातवारे करून मोठमोठ्याने काहीतरी बोलत होती. वृद्धापकाळाने कमरेतून वाकलेली माऊली वेदनांनी विव्हळत होती. लगेचच ती चिमुरडी आजीच्या जवळ गेली आणि तिच्या पोटाला घट्ट मिठी मारून रडू लागली. ट्रफिक सुरु झाला आणि गाडी चालू लागली, सगळे लगेचच नजरेआड झाले. हा प्रसंग घडून दोन-तिन वर्षे लोटली असतील पण तो अनेकदा डोळ्यासमोर येतो. मनावर त्याचा इतका खोलवर परिणाम झाला आहे की अनेकदा ती घटना डोळ्यासमोर येते आणि मन अस्वस्थ होते. ती लहानशी मुलगी, दारुड्याची बायको, आई यांची अगतिकता खूपच वेदनादायी आहे आणि सोबतच आजुबाजूला गावातील बघ्यांची निर्विकार गर्दी. आताही अनेकदा त्या रस्त्याने जावे लागते पण ती जागा येणार म्हटले की मी मोबाईलमध्ये डोके खूपसून बसतो आणि त्या बाजूला बघण्याचे धारिष्ट्यच होत नाही. कोण जाणे ती चिमुरडी पुन्हा दिसली तर?

      व्यावसायीक कामानेही अनेकवेळा लांबलांब प्रवासाचा योग आला. प्रवास करायचा म्हणजे गतीने जावे लगण्याची अपरिहार्यता आणि तिथे करायच्या कामांची यादी अशी साथसंगत. अशाच एका प्रवासात रेल्वे फाटकाजवळ गाडी अडकली. मध्यवस्तीत असल्याने सकाळी सकाळी गर्दी जमलेली. शाळेत मुलांना सोडणारे ऑटोरिक्षा आणि मस्ती करणारी पोरं, काही कर्तव्यावरील माता आपल्या चिमुरड्यांना शाळेत सोडायच्या लगबगीत असताना अकडकल्याने कंटाळलेल्या दिसत होत्या तर आईच्या पोटाला दोन्ही हाताने घट्ट धरून शाळेत जायला होणाऱ्या उशीराने आनंदलेली बाळगोपाळं, कोणाला ऑफिसला जायला होणारा उशीराची अस्वस्थता, बाईकवरील तरुणांची घुसाघुस, सायकल दोन्ही हाताने उचलून रेल्वे यायच्या आत फाटक पार करणारे असे काहीसे दृष्य होते तिथे.

      पण या सगळ्या गर्दीत माझे लक्ष गेले ते दुकानांच्या ओळीतील समोरच्या मोकळ्या जागेत बसलेल्या याचकांकडे. साधारण पन्नास-पंचावन वय गाठलेला अंध पुरुष, विकलांग स्त्री आणि तिसरा अंध तरुण असे तिघे जण होते. शारीरिक व्यंग असलेल्यांना आपल्या देशात उदरनिर्वाह करणे किती कठीण आहे हे जळजळीत सत्य आपण रोजच बघतो. वयस्काच्या हातात ढोलकी, स्त्रीच्या हातात एकतारी, तरुणाच्या हातात घुंगरु, टाळ आणि फरशीचे तुकडे अशी तालवाद्ये असा हा गायक-वाद्यवृंद भजन म्हणून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे याचना करत होता. संत मीराबाईचे मनमोहन कान्हा विनती करू दिन रैन.. या भजनावर त्यांनी ताल धरला होता. ढोलकी वादक आणि गायक ईश्वराची करूणा भाकत होता आणि इतर त्याला साथसंगत देत होते. अनेक वर्षे याचक म्हणून भजने म्हणताना त्याला कान्हाकृपेने सूर गवसला होता. याचकाच्या आवाजातील आर्जव मन हेलावणारा होता. भजन म्हणताना आणि विशेषकरून संत मीराबाईचे भजन ऐकताना एक अवर्णनिय आनंद मनाला होत असतो. मीराबाईची कान्हावरील प्रगाढ भक्ती, शब्दाचे अतुलनीय सौंदर्य आणि अप्रतिम चाल अंतर्मन सुखावणारी असते. पण सुरेल असूनही त्या याचकाच्या गाण्यात करूणा आणि दुःख जाणवत होते. भगवंता आम्हालाच असे जीणे का दिले? असा भाव प्रकट होत होता. मी तर भजन ऐकताना तंद्रीत गेलो होतो आणि विचारांचे काहूर मनात उठले होते आणि कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत रेल्वेने माझी तंद्री मोडली. फाटक उघडले आणि आम्ही सुसाट वेगाने पुढच्या प्रवासाला निघालो.

      नागपूरला बाबांची एन्जिओप्लास्टी झाली ती सुप्रसिद्ध के.जी. देशपांडे मेमोरिय हॉस्पीटलला. अतिशय शिस्तप्रिय डॉक्टरमंडळींचा आदरयुक्त धाक सगळ्यांना होता. सर्वोत्तम आणि पारदर्शक वैद्यकीय सेवा देणारे विदर्भातील नामवंत डॉक्टर्स अशी त्यांची ख्याती.  अशा या हॉस्पीटलमध्ये एन्जिओग्राफीसाठी मी आणि बाबा गेलो आणि डॉक्टरांनी थेट भरती करून घेत ऑपरेशनचा दिनांक सांगितला. 

      बाबांचे ऑपरेशन झाले आणि संध्याकाळी त्यांना ५ मिनिटे भेटायची परवानगी मिळाली आणि मी आय.सी.यु.मध्ये गेलो, बाबांशी बोललो ते तर व्यवस्था उत्तम असल्याने खूष होते.

      त्यांच्याशी बोलताना बाजुच्या बेडवर नजर गेली तर दोन-अडीच वर्षाची एक चिमुरडी शांत पडली होती. तिच्या शरिराला वेगवेगळ्या नळया लावल्या होत्या आणि तीचा श्वास सुरु होता एवढेच काय ते अस्तित्व जाणवत होते. बाबा बरे आहेत ही आनंदाची बाब समाधान देऊन गेली आणि त्या बाळाची काळजी मनात सुरु झाली. बाहेर आल्यावर तिचे आईवडील  भेटले. साधारण तिशीतले जोडपे होते ते. सहज बोलताना त्यांनी सांगितले की मागच्या एक महिन्यापासून आमची मुलगी भरती आहे. तिच्या हृदयाला छिद्र होतं. डॉ. स्वप्निल देशपांडे यांनी तिची अवघड शस्त्रक्रिया पार पाडली होती. सहज बोललो तर छकुलीचे आई-बाबा मन मोकळे करायला लागले. आमचे पहिलेच अपत्य आहे हे, खूप लाडाची लेक आहे आमची. माझ्याजवळ असलेले सगळे पैसे मी लावले तिच्या आजारपणाला. ऑपरेशन नंतर ८-१० दिवसात सुटी होणारर होती. ऑपरेशन छान झाले पण ऑपरेशन दरम्यान आमच्या छकुलीच्या मेंदुला ऑक्सिजन कमी पडला आणि ती कोमात गेली. एक महिना झाला ती भरती आहे. काही हालचाल नाही, बोलत नाही, रडत नाही. श्वास सुरु आहे पण ती आहे की नाही काहीच कळत नाही.

      आय.सी.यु. मध्ये दोन्ही हात खांद्याच्या वर, पाय बाजुला सारलेले आणि गाढ झोप लागावी तशी ती चिमुरडी एवढ्या मोठ्या पलंगावर झोपली होती. गोरापान रंग, हलका गुलाबी फ्रॉक, पायात चांदीच्या तोरड्या आणि काळ्या धाग्यात गुंडाळलेला एक छोटासा सोन्याचा मणी गळ्यात घातलेली गोड गोंडस मुलगी आहे की नाही कळतच नव्हते. ३-४ दिवस बाबांना भेटायला गेलो की त्या चिमुरडीकडे बघायचो. रोज तिच्या आईवडीलांची भेट व्हायची.

      बाबांच्या ऑपरेशन नंतर एक महिन्याने पुन्हा चेक-अपला गेलो तर त्या छकुलीचे आईबाबा तिथेच होते. त्यांना बघून जीव कासाविस झाला. आस्थेने येऊन भेटले पण चेहरा सगळे सांगत होता. अजूनही तशीच आहे हो आमची छकुली. डॉक्टर म्हणाले की कधी शुद्धीवर येईल काहीच सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा आपण लाईफ सपोर्ट काढू, तुम्ही काही काळजी करू नका. जेवढे पैसे तुम्ही दिले तेवढे पुरे झाले आता पैसे नको. आपण वाट बघू देवाने चमत्कार घडवला तर मुलगी पुन्हा खेळू बागडू लागेल. तुमची ईच्छा आहे तोपर्यंत तो बेड आम्ही तिच्यासाठीच ठेवू. मी तर निःशब्द उभा होतो. एवढ्या वेळेत बाबा तपासणी करून परत आले. तो अर्धा तास त्या छकुलीचे आईबाबा आणि मी बोलत होतो.

      पुन्हा दोन महिन्यांनी बाबांना तपासयाला घेऊन गेलो. माझी नजर सारखी त्या छकुलीच्या आईबाबांना शोधत होती, पण ते दिसलेच नाही. अगदी अगतिक होऊन मी स्वागत कक्षावर चौकशी केली. तिथल्या मुलीने सांगितले की एक महिन्यापूर्वी ती छकुली गेली. सगळे हॉस्पीटल त्या दिवशी खूप रडले. सगळ्यांना जीव लावला होता पोरिने. आजही त्या छकुलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो, तिचे आईवडील आठवतात. त्यानंतर कधी तो परिवार भेटला नाही पुन्हा कधी भेट होईल की नाही माहिती नाही पण कायमचे ऋणानुबंध जुळल्यासारखे वाटते.

      अशा घटना आयुष्यात खूप काही शिकवून जातात, दीर्घकालीन प्रभाव टाकून जातात. जीवनाकडे वेगळ्या नजरेने बघायला लावणाऱ्या या घटनांमधून मनातला अहंकार, दंभ कमी झाला तरी मिळवले म्हणायचे. या प्रसंगांमधून संवेदना जागृत होतात आणि नवी दृष्टी देऊन जातात. दारुड्याची असह्य पत्नी, आई आणि मुलगी, याचकांच्या स्वरातील आर्जव, हॉस्पीटलमध्ये जीवन संघर्ष हरलेली चिमुकली माझ्या मनावर खोल परिणाम करून गेले. जीवन किती क्षणभंगूर आहे याची जाणीव यातून होत राहते. पण आपण मात्र सगळ्या गोष्टींसाठी आसक्त होत जातो. वाढत्या वयाबरोबर प्रत्येक गोष्टीत गुंतत जातो. या गुंतण्याचा त्याग जितका जास्त तेवढा आप्तेष्टांना आणि आपल्याला त्रास कमी. या प्रसंगांमधून जुळणारे ऋणानुबंध, अल्पकाळातील स्नेह वारंवार आठवतात आणि पाय जमिनिवर ठेवायला मदत करतात.

रवीन्द्र देशपांडे