कर्करोगाच्या उपचार पद्धतींची मुलतत्त्वे

कर्करोग किंवा कॅन्सर हा जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा यमदूत म्हटलं पाहिजे. जगात सर्वाधिक मृत्यू हृदयविकारामुळे होतात, त्यापाठोपाठ आहे कॅन्सर. त्याबरोबरच गेल्या काही दशकांमध्ये कर्करोगावरील उपचारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. अनेक नवीन उपचारपद्धती आल्या आहेत. अनेक प्रकारचे कर्करोग बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. नजीकच्या भविष्यात अनेक कर्करोग, मधुमेह किंवा रक्तदाब यांच्याप्रमाणे दीर्घ काळ चालणारे पण आटोक्यात राहू शकणारे आजार झाले आहेत, असेही चित्र बघायला मिळेल.

      आपल्यापैकी अनेकांचे नातेवाईक, मित्र , परिचित कोणी न कोणी असे असते की ज्याचे कर्करोगाचे निदान झाले आहे किंवा ज्याने कर्करोगाचे उपचार घेतले आहेत. कॅन्सरचे निदान हाती येणे हा अत्यंत क्लेशकारक अनुभव असतो - रोगभय तर असतेच पण त्यापेक्षा अधिक उपचारांची भीती देखील असते. अनेक रुग्ण महत्वाचे उपचार करून घेण्यास नकार देतात. त्यांच्या मनाची ठाम समजूत अशी असते की उपचारांदरम्यान होणारा त्रास हा आजारापेक्षा भयंकर आहे. उपचारांनी बरे होण्याच्या शक्यतेची दारे तर बंद होतातच पण, हे केवढे दुर्दैव की निराधार आणि अतिशयोक्त भीतीपोटी या आशेकडे पाठ फिरवली जाते! तेव्हा या लेखातून कॅन्सरच्या वेगवेगळ्या उपचारपद्धती आणि काही महत्वाची 'टर्मिनॉलॉजी' आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू .

कॅन्सरसाठी सर्जरी - ऑन्कोसर्जरी

      कॅन्सर हा मुळातच एका मर्यादेत न राहणारा आजार आहे. शरीरातील अनेक व दूरच्या अवयवांवर कॅन्सर पाश टाकतो. निदानाच्या वेळी असणारी  ' स्टेज ' साधारणपणे तो किती पसरला आहे हे दर्शवते. कोणता कॅन्सर आहे यावरून होणार त्रास, कुठे पसरला , काय उपचार या गोष्टी ठरतात.  स्टेजनुसार जरी उपचारांची रूपरेखा ठरवावी लागत असली तरी   कॅन्सरच्या कोणत्याही शल्यक्रियेमध्ये काही गोष्टी समान असतात. या शस्त्रक्रिया ' रॅडिकल ' अर्थात मोठ्या आणि पार मुळातून केलेल्या असतात. रोगाने गिळंकृत केलेला भाग पूर्णपणे काढला जाऊन ' क्लिअर मार्जिन ' म्हणजे सूक्ष्मपणे देखील जिथे कॅन्सर पोचलेला नाही अशी किनार मिळायला हवी. त्याचमुळे या शस्त्रक्रिया मोठ्या, जटील , अधिक वेळ घेणाऱ्या  असतात. विशेष प्रशिक्षण व अनुभव असणारे शल्यचिकित्सक या शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रिया किती कौशल्याने केली गेली यावर रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता थेट अवलंबून असते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. कॅन्सर च्या शस्त्रक्रियेमध्ये ' लिम्फ नोड्स' आणि लिम्फ वाहिन्या सुद्धा काढून टाकाव्या लागतात. लिम्फ किंवा लसीका हे मुख्यतः  मेद आणि प्रथिने असणारे द्रव्य असते आणि ते वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे सूक्ष्म जाळे पूर्ण शरीरात असते. लिम्फ नोड्स या छोट्या ग्रंथी या वाहिन्यांच्या जाळ्यात असतात. कर्करोगाच्या पेशी बहुतांश वेळेला या लिम्फ वाहिन्यांना छेदून आत प्रवेश करतात व ग्रंथींमध्ये घर करतात. जर अशा रोगग्रस्त ग्रंथी  शस्त्रक्रियेच्या वेळी मागे राहून गेल्या तर अर्थातच आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता खूप वाढते. कर्करोगाचे  ' स्टेजिंग' करताना या ग्रंथींची योग्य पडताळणी करून त्या प्रमाणेच उपचाराची दिशा ठरवावी लागते.

      शस्त्रक्रिया मोठी असते, त्यामुळे अर्थातच गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता देखील जास्त असते. याबाबत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली अशी की शास्त्रक्रियार्मुळे होणार फायदा हा त्यातून होऊ शकणाऱ्या गुंतागुंतीपेक्षा जास्त असतो आणि दुसरी ही की , शस्त्रक्रियेच्या ' कॉम्प्लिकेशन्स '  वर सुद्धा उपचार करता येतात. आज उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय तंत्रज्ञान व औषधांमुळे आपण जवळजवळ प्रत्येक समस्येवर यशस्वीपणे मात करू शकतो. शस्त्रक्रियेनंतर जसा काळ जाईल तसे बहुतांशी रुग्ण पूर्ववत होऊ लागतात. काही जण विचारतात, " माझ्या जीवाला धोका आहे का? " प्रामाणिक उत्तर ' नाही ' असेच आहे, पण सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेऊन देखील काही जण पुन्हा बाहेर पडत नाहीत. वैद्यकीय दृष्ट्या मात्र कर्करोगाच्या शस्त्रक्रिया आता खूप मोठ्या प्रमाणावर सुरक्षित झाल्या आहेत.

किमोथेरपी

      हा शब्द ऐकताच रुग्ण व त्याच्या कुटुंबियांच्या पोटात गोळा येतो. '  सायटोटॉक्सिक '  औषधे म्हणजेच  ' कर्करोगाच्या पेशींना मारणारी औषधे ' देण्याला किमोथेरपी म्हणतात. कर्करोगाच्या पेशींचे वैशिष्ट्य असे असते की त्या सतत विभाजन व त्यायोगे विस्तार या अवस्थेत असतात. किमोथेरपीची औषधे हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन तयार केली जातात. याचा परिणाम शरीरातील काही नॉर्मल पेशींवर देखील होतो  व त्यातूनच किमोथेरपीची भीती घालणारे दुष्परिणाम निर्माण होतात.

      रुग्णाच्या आप्तांना  किमो चे महत्वाचे दोन प्रकार समजून घ्यावे लागतात. क्युरेटिव्ह  म्हणजे " ज्याचे उद्देश्य रोगमुक्ती आहे " व दुसरा प्रकार पॅलिएटिव्ह म्हणजे " केवळ रोग नियंत्रणाचे तात्कालिक उद्देश्य असणे " .

ज्या रुग्णाचे निदान लवकर होते व त्याचा रोग स्टेज १/२ असा असतो त्याला शस्त्रक्रिया , रेडिएशन यांच्या बरोबरीने संपूर्ण रोगमुक्तीच्या उद्देश्याने किमो दिली जाते. साधारणपणे काही तास किंवा १-२ दिवस हॉस्पिटलमध्ये राहून शिरेतून इंजेक्शन द्वारे योग्य त्या मात्रेत ही औषधे दिली जातात. सध्या उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या मदतीने दुष्परिणाम आटोक्यात ठेवता येतात. किमो मुळे होणारे  सर्वसाधारण आणि सर्वपरिचित दुष्परिणाम म्हणजे अशक्तपणा, भूक न लागणे, मळमळ , उलटी, पातळ संडास, केस गळणे , त्वचा व नखे काळे पडणे हे होत. किमो चे उपचार संपले की हे त्रास कमी होऊन पूर्णपणे संपतात देखील. आपण रोगमुक्तीसाठी किमो देत असताना त्यातून मिळणाऱ्या फायद्याचे पारडे या दुष्परीणामांच्या पारड्यापेक्षा नेहमीच जड असते. किमो प्रत्येक रुग्णाला त्याचा रोग, वय, वजन, इतर आजार या सर्वांचा विचार करून दिली जाते. कोणताही ' फॉर्म्युला ' लावून नव्हे तर रुग्णाचा संपूर्ण विचार करून किमो प्लॅन केली जाते.

      काही रुग्ण असे असतात की  त्यांचे निदान उशिरा झालेले असते , किंवा उपचारांचे आधीचे प्रयत्न पुरेसे सफल झालेले नसतात. कधी कधी रोगाची व्याप्ती इतकी जास्त व किचकट असते की शस्त्रक्रिया अशक्य होऊन जाते. अशा वेळी पॅलिएटिव्ह किमो चा आधार घेतला जातो. रुग्णाचे जे जीवनमान अपेक्षित आहे तेवढा काळ त्याला त्रास कमी व्हावा, वेदना कमी व्हाव्या, परावलंबित्व येऊ नये असा प्रयत्न यातून केला जातो. यांना किमोचे कमी डोस दिले जातात. अशा रुग्णांची प्रकृती अधिक नाजूक झालेली असते व त्यांना सहन होईल अशा पद्धतीनेच उपाययोजना केली जाते.

      या  दोन प्रकारच्या किमोथेरपीबाबत अनेकांच्या मनात गोंधळ उत्पन्न होतो. किमोथेरपीचे भय व योग्य माहितीचा अभाव यामुळे हातात वेळ असताना निर्णय चुकण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या डॉक्टरशी मोकळी व सविस्तर चर्चा केल्याने आपण नेमके काय साधायचे व त्यासाठी काय करायचे याबाबत रुग्ण व त्याच्या कुटुंबियांना स्पष्ट कल्पना येऊ शकते.

रेडिएशन

      या उपचारपद्धतीला लाईट देणे, शेक देणे , ट्युमर जाळणे अशी अनेक नावे रुग्णांमध्ये प्रचलित आहेत.  गॅमा किरणांच्या मदतीने कर्करोगाच्या पेशींना नष्ट केले जाते. आजूबाजूच्या निरोगी पेशिंनादेखील थोडी इजा होते व त्यामुळे अल्सर सारखे दुष्परिणाम होतात. उपचार संपले की सर्व काही पूर्ववत होऊ लागते. किमो प्रमाणे रेडिएशन देखील कसे व किती द्यायचे हे रुग्णाच्या संपूर्ण परिस्थितीप्रमाणे ठरवले जाते. साधारणपणे, ३-६ आठवड्यांचा कालावधी असतो व सोमवार ते शुक्रवार रेडिएशन देऊन दोन दिवस विश्रांती दिली जाते. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता अधिक अचूकपणे केवळ कर्करोग प्रभावित भागालाच रेडिएशन देऊन, निरोगी पेशींना हानी न होऊ देणे शक्य होते आहे. अशा पद्धतीचे उपचार सुरु करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरशी सविस्तर चर्चा केलेली उत्तम!

टार्गेटेड थेरपी

      कर्करोगाच्या पेशींवर गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड संशोधन झाले आहे. त्यांच्या अंतःस्थातील बदल, त्या पेशींच्या पृष्ठभागाची रचना , त्यांचा इतर रासायनिक पदार्थांशी असणारा कुलूप-किल्ली सारखा संबंध या सर्व गोष्टींच्या ज्ञानामुळे कर्करोगाच्या उपचारांची एक नवी दिशा खुली झाली. पेशींच्या विभाजनाला सुरुवात करणाऱ्या पायरीचे कुलूप उघडणारी किल्ली तिच्या कुलुपापर्यंत पोचूच नये व ते कुलूप उघडले जाऊ नये अशी नेमकी सोय काही विशिष्ट औषधांद्वारे करणे शक्य झाले. यामुळे कर्करोगाच्या वाढीवर पूर्ण आळा घालणे जमू लागले. हे यश काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला मिळाले आहे. त्या रुग्णांचे यामुळे अक्षरशः आयुष्य बदलले आहे. याचे एक उदाहरण म्हणजे CML हा रक्ताचा कर्करोग व इमॅटिनीब हे त्याचे औषध! त्याचप्रमाणे रोज केवळ एक गोळी म्हणून घेण्याच्या औषधाने स्टेज ४ मधील फुफुसाच्या कर्करोगाचे चित्र देखील पालटून टाकले आहे. या क्षेत्रातील संशोधनामुळे अशी आशा वाटते की एक दिवस बहुतांशी प्रकारच्या कर्करोगांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांच्यासारखे गोळ्या घेऊन नियंत्रणात ठेवणे शक्य होईल व आयुष्य जवळजवळ कर्करोगमुक्त पद्धतीने जगता येईल.

इम्युनोथेरपी

      २१ शतकातील ही उपचार पद्धती खूप आशादायी व अनेकविध शक्यतांची दारे उघडणारी आहे असे म्हटले तर ते अवाजवी ठरणार नाही. या पद्धतीच्या प्रणेत्या शास्त्रज्ञांना २०१८ सालच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपली इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती ही सर्वत्र पहारा देत असते. बाहेरून रक्तप्रवाहात किंवा शरीरात आलेला जंतू/ विषाणू/ पेशी यांना ती ओळखते व लागलीच त्याविरुद्ध कार्यरत होते. मात्र कर्करोगाच्या पेशींना त्यांच्या काही वैशिष्ट्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती  ' धोकादायक  ' म्हणून ओळखू शकत नाही. इम्यूनिटीच्या चौक्यांना कर्करोग पेशी जणू काही बुरखा घालून पार करतात व शरीरभर पसरत राहतात. आपण जेव्हा इम्युनोथेरपी चा वापर करतो तेव्हा आपण हा कर्करोग पेशींचा बुरखा हातावणारी औषधे देतो. त्यामुळे या पेशी उघड्या पडतात व रोगप्रतिकारशक्तीच्या नजरेत येतात. मग खुद्द आपल्याच शरीराचे हे रक्षणकर्ते कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्यासाठी पुढे येतात व एखाद्या संसर्गाशी लढल्याप्रमाणे कर्करोगाशी देखील लढतात! ही पद्धत सध्या अगदी मोजक्या प्रकारच्या कर्करोगासाठी प्रायोगिक तत्वावर वापरात आहेत. यावर अजून मोठ्या प्रमाणावरचे ट्रायल्स होणे, उपयुक्ततेचे ठोस पुरावे मिळणे, यशस्वतीचे कालावधी पाहणे, दुष्परिणाम जोखणे अशी अनेक पद्धतीची कामे सुरु आहेत. पण नजीकच्या भविष्यात हे मोठे यश कर्करोगाच्या उपचारांचा चेहरा-मोहराच बदलेल असे म्हणायला हरकत नाही.

      कर्करोगावरचे उपचार हे नेमके कोणकोणत्या पद्धतीचे असतात याची आपण थोडक्यात माहिती घेतली. एखाद्या रुग्णांसाठी यातील काय योग्य व आवश्यक आहे याची चर्चा कर्करोगतज्ञ रुग्ण व त्याच्या नातेवाईकांशी करतात व पुढील दिशा  ठरवतात. अनेकदा त्याच्यात या प्रत्येक पद्धतीच्या तज्ञांची एकत्र बैठक होऊन नेमके आपल्या रुग्णासाठी सगळ्यात उत्तम उपाययोजना कोणती याचा निर्णय होतो. तज्ञांकडे उपचारांची आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे व ' प्रोटोकॉल ' असतात तसेच रुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप व माहिती केंद्रे देखील असतात. कर्करोगाचे निदान म्हणजे मृत्यू अटळ, या परिस्थितीपासून आता वैद्यकीय क्षेत्राने खूप मोठा पल्ला पार केला आहे. अनेक प्रकारच्या कर्करोगाच्या बाबतीत खूप मोठे यश मिळवले आहे. जितक्या अधिक रुग्णांना लवकर निदान व योग्य उपचार मिळतील तितक्या अधिक वेगाने आपल्याला कर्करोगाचे समाजातले चित्र बदलता येईल. अनाठायी भीती व साशंकता बाजूला सारून कर्करोगाला लढा देऊन पराजित करणे हे आपले ध्येय असायला हवे!!!

डॉ. जॉय घोष